नाशिक – राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी गाजले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याप्रकरणात ठाण्यासह नाशिक शहराचा उल्लेख झाल्याने नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली. विशेषत: राजकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये असा प्रकार खरोखर झाला असेल काय, इथपासून तर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपात उल्लेख करण्यात येत असलेले हाॅटेल कोणते, याविषयी अंदाज लावला जात आहे.

हनीट्रॅपचा उल्लेख करुन विरोधकांनी गुरुवारी अधिवेशन गाजविले. प्रामुख्याने काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. नाशिकचेही नाव या प्रकरणात विरोधकांनी घेतले. हनीट्रॅपच्या माध्यमातून काही गोपनीय माहिती आणि कागदपत्रे असामाजिक तत्वांच्या हाती जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. नाना पटोले यांनी तर यासंदर्भातील पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा केला. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी,नाशिकसह ठाण्यात पोलिसांकडून याबाबत चौकशी झाली असल्याची माहिती असल्याचे नमूद केले. हनीट्रॅपमध्ये काही राजकीय लोकांचे नाव असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विधिमंडळ अधिवेशनात हनीट्रॅप प्रकरणात नाशिकचा उल्लेख झाल्याने शहरात खळबळ उडाली. नाशिक दौऱ्यावर अलिकडेच आलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील काही वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता. एका महिलेच्या जाळ्यात ही मंडळी अडकली. नाशिकच्या एका अलिशान हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा असल्याचेही संबंधित नेत्याने सांगितले.

नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केल्याचे सांगितले जाते. परंतु, पोलिसांकडून यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही यासंदर्भात तक्रार दिली असून या प्रकरणाच्या तपासात ओळख सार्वजनिक न करण्याची तक्रारदारांची इच्छा असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येत असल्याचे समजते. विधिमंडळात हे प्रकरण मांडण्यात आल्याने याविषयी तपासाला वेग येण्याची शक्यता असताना नाशिकमधील कोणत्या आलिशान हाॅटेलमध्ये असा प्रकार झाला असावा, याविषयी चर्चा रंगली आहे.