नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ रविवारी ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे या वादग्रस्त पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी त्यांनी बागूल यांना हा शेवटचा प्रवेश असल्याचे सांगत आता इकडेतिकडे न जाण्याचा सल्ला दिला.

भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांकडून विरोधी पक्षातील प्रामुख्याने ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी गळाला लावले जात आहेत. त्याअंतर्गत भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर आधी गुन्हे दाखल केले जातात आणि नंतर त्यांचा पक्षात प्रवेश घडवला जातो, असा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार होत आहे. त्यासाठी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर पार्टी केल्याचा आरोप असणारे सुधाकर बडगुजर आणि महिनाभरापूर्वी मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल झालेले बागूल आणि राजवाडे यांचा दाखला दिला गेला. बागूल आणि राजवाडे यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याने अचानक तक्रार मागे घेतली. दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने तक्रार मागे घेतल्याचे कारण संबंधिताने दिले होते. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बागूल समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राहुल ढिकले, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे भाजपचे स्थानिक आमदारही उपस्थित होते.

नाशिकमध्ये भाजप हाऊसफुल

बागूल, राजवाडे यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सर्वच प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये आले असून त्यांच्याकडे अध्यक्ष होण्यासही आता कोणी तयार नाही, असे सांगितले. ठाकरे गटाचे सध्याचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांना प्रवेश दिला जाणार नाही. नाशिक भाजप आता ’हाऊसफुल्ल‘ झाल्याचे त्यांनी नमूद केले. खा. संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता महाजन यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांच्या पक्षाची बिकट अवस्था झाल्याचे सांगितले. सुनील बागूल यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करणे सोपे राहिलेले नाही, संबंधिताची पार्श्वभूमी व पोलीस नोंदी तपासल्या जातात. सर्व अनुकूल असेल, तरच प्रवेश मिळतो. असे नमूद केले.