धुळे : कृषिमंत्रीपद जाणार की राहणार, या दोलायमान अवस्थेत शुक्रवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले माणिक कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेनेतर्फे (उध्दव ठाकरे) काळे झेंडे दाखविण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे मंत्री कोकाटे यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे (ता. शिंदखेडा) शिवारात सकाळी ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले. ‘चले जाव, माणिक कोकाटे चले जाओ,’ ‘कोकाटे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मंत्री कोकाटे हे शिंदखेडा येथे एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा दौऱ्यावर आले असताना धुळे शहरातील हॉटेल टॉप लाईन येथे थांबले होते. कृषिमंत्र्यांनी वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेतल्यामुळे ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवित कोकाटे यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याला विरोध केला.
धुळे जिल्ह्याच महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील कांदा, कापूस उत्पादक संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषिमंत्र्यांना कसा वेळ मिळतो, असा प्रश्न संतप्त आंदोलकांनी यावेळी केला. कोकाटे हे थांबलेल्या हॉटेल टॉप लाईन येथेही विरोधात निदर्शने करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत दोन तास शिवसैनिकांनी कोकाटे यांना हॉटेल टॉप लाईनमधून बाहेर पडू दिले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही (शरद पवार) मंत्री कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला विरोध करण्यात आला. कोकाटे थांबलेल्या हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे हाती घेत त्यांचा निषेध केला. कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. कोकाटे यांच्या सुरक्षेसाठी हाॅटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील,गजेंद्र पाटील आदींचा आंदोलनात सहभाग होता.