जळगाव : हनी ट्रॅपसह बलात्काराच्या आरोपावरून गुन्हे दाखल झालेल्या प्रफुल्ल लोढामुळे जामनेर तालुका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. लोढा सध्या भाजपमध्येच असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे. दरम्यान, जामनेरमधील शरद पवार गटाच्या एका नेत्याने संशयिताची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून आणखी खळबळ उडवून दिली आहे. तसे केल्याने संपूर्ण हनी ट्रॅप प्रकरण बाहेर येईल. कोण खरे आणि कोण खोटे हे समजेल, असेही त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
पहूर येथील रहिवाशी मूळ असलेल्या संशयित प्रफुल्ल लोढा याच्यावर हनी ट्रॅपसह इतर काही प्रकरणांमुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर जामनेर तालुका पुरता हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी थेट भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत, प्रफुल्ल लोढासोबत त्यांचे जुने आणि घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे, तर हॅनी ट्रॅप प्रकरणात महाजन यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा याने पत्रकारांशी संवाद साधताना या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय सूडभावना असल्याचे म्हटले आहे. माझ्या वडिलांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे खोटे असून हनी ट्रॅपशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या मोठ्या साहेबांचा हात असल्याचा गंभीर आरोपही पवन लोढा याने केला आहे.
या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शरद पवार गटाचे नेते दिलीप खोडपे यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील संशयिताची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. नार्को टेस्टमुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल. कोण खरे आणि कोण खोटे तसेच कोणी हनी खाल्ले आणि कोण ट्रॅपमध्ये अडकले ते समजेल, अशी खोचक टिप्पणी खोडपे यांनी केली. हनी ट्रॅपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्याविषयी बोलताना तशी चर्चा असू शकेल. कारण, संपूर्ण जामनेर तालुक्याला माहिती आहे की प्रफुल्ल लोढा हा पूर्वी आणि आता कोणाचा कार्यकर्ता आहे, असा टोला देखील खोडपे यांनी हाणला.
जामनेर तालुक्यातील नेरी येथील मूळ रहिवाशी असलेले दिलीप खोडपे हे एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक मानले जायचे. महाजन आणि खोडपे यांच्यात कालांतराने मतभेद निर्माण झाल्याने खोडपे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट मंत्री महाजन यांनाच जामनेरमध्ये आव्हान दिले. विशेष म्हणजे एक लाखांपेक्षा जास्त मते त्यांनी मिळवून त्यांनी गिरीश महाजन यांना चांगलाच घाम फोडला होता.