जळगाव: जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि तीन आमदार तसेच इतरही बरेच पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) साथ सोडून शनिवारी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले असताना, कोणी कुठेही गेले तरी मी शरद पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
जळगाव जिल्ह्यात एकेकाळी मोठा दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत मोठी वाताहात झाली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने, पक्षाचे उरलेसुरले अवसान गळून पडले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्यासह नवीन उभारी देण्यासाठी नंतर निरीक्षक भास्करराव काळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावण्यात आला.
परंतु, त्यातून फार काही साध्य झाले नाही. पक्षाच्या पातळीवर सगळा आनंदी आनंदच आहे. सत्ताधाऱ्यांना शेतीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच जिल्ह्याची कायदा व सुवस्थेची स्थिती बिघडल्याबद्दल जाब विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. एकमेव आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी महायुतीला जेरीस आणल्याचे दिसून आले.
अशा स्थितीत, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जुने निष्ठावान डॉ. सतीश पाटील हेही अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कोणी कुठेही गेले तरी मी शरद पवारांची साथ अजिबात सोडणार नाही.
मी खानदानी माणूस असून, त्यांच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घातले असल्याचे डॉ. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. तोच धागा पकडून आता कुठे गेली तुमची शरद पवार यांच्यावरील निष्ठा, असा टोला एकनाथ खडसे यांनी डॉ. पाटील यांना लगावला आहे. पक्ष सोडून जाण्याच्या माझ्या काही अडचणी होत्या. हे लोक विकासासाठी अजित पवार गटात जात असल्याचे सांगत आहेत. मात्र, जुन्या लोकांनी अशी मध्येच शरद पवार यांची साथ सोडायला नको होती, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.