जळगाव – गेल्याच आठवड्यात अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पाचोरा तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वरखेडी येथील एक शेतकऱ्याचा शेतातून घरी परत येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. नद्यांचे पाणी पाचोरा शहरासह अनेक गावांमध्ये शिरले. शेती पिकांचेही पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
वरखेडी येथील रहिवाशी सतीश मोहन चौधरी (३५) हे शेती सांभाळून पोस्टात टपाल वितरणाचे काम करत. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी वरखेडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यामुळे काही नुकसान झाले आहे का, हे पाहण्यासाठी ते सोमवारी सकाळी शेतात गेले होते.
दरम्यान, शेतात पोहोचत नाही तितक्यात पुन्हा जोरात पाऊस सुरू झाल्याने ते एका झाडाखाली काही वेळ थांबले. पाऊस थोडा कमी झाल्यावर सांगवी गावाच्या रस्त्यावरून वरखेडीकडे येण्यास निघाले. मात्र, सांगवी ते वरखेडी दरम्यानच्या नाल्यास अचानक मोठा पूर आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. ग्रामस्थांना वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
पाचोरा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आधीच परिस्थिती बिकट झाली आहे. तशात रविवारी रात्री व सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा हाहाकार माजला आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात बनोटी परिसरात तसेच पाचोरा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पुन्हा दमदार पाऊस झाल्यावर अग्नावती, हिवरा, बहुळा, इंद्रायणी, गडद, तितुर आणि उतावळी, या नद्यांना मोठे पूर आले आहेत.
अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नगरदेवळा गावातील बाजारपेठेतही पाणी शिरले आहे. पाचोरा शहरातील कृष्णापुरी आणि पांचाळेश्वराच्या जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पाचोरा शहर ते कृष्णापुरी दरम्यानचा रस्ता बंद झाला. हिवरा नदीच्या काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
अनेक गावांचा संपर्क तुटला
भोजे ते चिंचपुरा, राजुरी बुद्रुक ते राजुरी खुर्द, निंभोरी बुद्रुक ते निंभोरी खुर्द, वाणेगाव, पिंप्री ते सार्वे- सातगाव डोंगरी, वरखेडी ते सावखेडा बुद्रुक- सावखेडा खुर्द, वेरूळी बुद्रुक ते वेरूळी खुर्द, लोहारी बुद्रुक ते लोहारी खुर्द, या गावांचा संपर्क तुटला आहे. नद्यांच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण आहेर, तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी बी.के.अंजने यांनी केले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाल्यानंतर पूर स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.