नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर, वेगवेगळ्या सोयी सुविधांसाठी संघटना मैदानात उतरल्या आहेत. कुंभमेळ्यात नाशिकरोडसह नाशिकजवळील ओढा, लासलगाव, शिर्डी या रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची घोषणा याआधीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. नाशिकमध्ये रोजगार, व्यवसायानिमित्त गुजरात, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमधील अनेक जण स्थायिक झाले आहेत. तसेच त्या राज्यांमध्येही नाशिकमधील अनेक जण स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गुजरात, राजस्थान आणि हरियाणा येथे जाण्यासाठी नाशिकहून थेट रेल्वेसेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पुढाकारातून लवकरच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्यात येणार आहे. गुजरात, राजस्थान आणि हरियाणा प्रवासी संघटनांची नाशिकच्या द्वारका येथील कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत गुजरात, राजस्थान आणि हरियाणासाठी नाशिकहून थेट रेल्वेसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांच्यासह गुजरात, राजस्थान आणि हरियाणा प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक शहरासह जिल्ह्यात राजस्थानचे अनेक व्यावसायिक मोबाईल विक्री, दुरुस्ती तसेच खानपान सेवेत कार्यरत आहेत. बैठकीत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक ते गुजरात, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील तसेच बाहेरगावी स्थलांतरित झालेल्या समाजाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या मार्गावर रेल्वेसुविधेची गरज असून सध्या थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

या विषयावर सर्व उपस्थितांनी एकमताने ठराव करत पुढील काळात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नाशिक–गुजरात–राजस्थान–हरियाणा मार्गासाठी थेट रेल्वेगाडी सुरू करण्याचे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रवासी संघाचे पदाधिकारी लवकरच प्रतिनिधी मंडळासह नवी दिल्ली येथे भेट देणार आहेत. नाशिक ते उत्तर भारत या राज्यांदरम्यान थेट रेल्वे सुरू झाल्यास हजारो प्रवासी नागरिकांना दिलासा मिळेल. यामुळे नाशिक आणि गुजरात–राजस्थान–हरियाणा या राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक संबंधांना चालना मिळेल, अशा भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केल्या आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर ही मागणी करण्यात आल्याने या मागणीला विशेष महत्व आहे.