जळगाव : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेले आंदोलन मागे घेण्याकरिता राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र, प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस यांचे दूत बनून जरांगे पाटील यांची मनधरणी करणारे मंत्री गिरीश महाजन यावेळी कुठेच दिसले नाही. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी मागे घेतले. तत्पूर्वी, मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता. त्यांनी उपसमितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यानंतर जरांगे यांनी सरकारचा जीआर स्वीकारत आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
प्रत्येक वेळी जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी पुढे असणारे गिरीश महाजन यावेळी पडद्यामागेच राहिले. दोन वर्षांपूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले होते. आणि ते मागे घेण्यात यावे म्हणून नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले होते. त्यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत आदींचा समावेश होता.
प्रत्यक्षात, जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही. परंतु, त्यानंतरही प्रयत्न न सोडणाऱ्या गिरीश महाजन यांनी रावसाहेब दानवेंना सोबत घेऊन सरकारच्या वतीने यशस्वी शिष्टाई केली होती. जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये गेले होते आणि त्यांच्या हस्ते फळांचा ज्यूस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले होते. तरीही, मराठा आरक्षणाचा प्रश्न तेव्हाही सुटला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस हेच मोठा अडथळा असल्याचा आरोप करून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांनाही लक्ष्य केले.
जामनेरमध्ये एक लाख २० हजार मराठा समाज बांधव आहेत.आता बघतोच गिरीश महाजनकडे… इंगाच दाखवतो… या शब्दांत मनोज जरांगेने मंत्री महाजन यांना आव्हान दिले होते. ज्यामुळे जामनेरमध्ये महाजन समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. परंतु, तसे काही झाले नाही. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूनशी प्रवृत्तीचे आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना तारतम्य ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला मंत्री महाजन यांनी त्यांना चाळीसगावमध्ये बोलताना दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. दुर्दैवाने ते आरक्षण न्यायालात टिकले नाही, अशीही खंत महाजन यांनी व्यक्त केली होती.