जळगाव : जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पावसाचे आगमन झाले असले, तरी अतिवृष्टीसह वादळी वारे आणि पुराच्या पाण्यामुळे १२ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीवर त्यामुळे पाणी फिरले असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके जमिनदोस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

महिनाभराच्या खंडानंतर दमदार पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी नद्यांसह नाल्यांच्या काठावरील तसेच सखल भागातील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात १५, १६, १७ आणि १८ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीसह वादळी वारे आणि पुराच्या पाण्यामुळे २६९ गावांमधील सुमारे १५ हजार ६९५ शेतकरी बाधित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे १२ हजार ३२६ हेक्टरवरील कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, केळी, ऊस आणि भाजीपाला पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. पैकी मक्याचे सर्वाधिक ५१७२ हेक्टर तसेच कपाशीचे ४९९५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. इतरही बऱ्याच पिकांचे नुकसान झाल्याने संबंधित सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव दौऱ्यावर असताना अतिवृष्टीसह इतर कारणांनी नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले. प्रत्यक्षात पाऊस थांबल्यानंतरही महसूल व कृषी विभागाने पिकांचे पंचनामे करण्यास अजुनही गती दिलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, ढगफुटी सदृश्य पावसामुळे भूईसपाट झालेल्या शेतांमधील खरीप पिके तसेच इतर मालमत्तांच्या नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतचे निवेदन ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले. त्या माध्यमातून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही संबंधितांनी केली.

शासन स्तरावर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांच्या मार्फत तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावे. त्याच प्रमाणे पीकविमा भरपाई मंजूर करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले. या वेळी ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उप जिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनावणे, शेतकरी अशोक बडगुजर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, गुलाबराव कांबळे, डॉ.रमाकांत कदम, सचिन चौधरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, विजय बांदल, किरण ठाकूर आदी उपस्थित होते.