नाशिक : काही दिवसांपासून नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचे हल्लेही होत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. बिबट्यांना जेरबंद करावे, या मागणीसाठी जयभवानी रोड परिसरातील रहिवाशांनी शनिवारी एकत्र येत वनविभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करुन मोर्चा काढला. मोर्चा श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आल्यावर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणतांना अडचणी आल्या.
जयभवानी रोडवरील लोणकर मळा, पाटोळे मळा, मनोहर गार्डन या भागात वारंवार बिबट्या दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या भागात बिबट्याने दोन लहान बालकांचा बळी घेतला. त्याविरोधात नागरिकांनी एकत्र येत वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात १८ पिंजरे लावले. १५ कॅमेरे, वेगवेगळी पथके, थर्मल ड्रोनच्या आधारे बिबट्याचा शोध सुरू ठेवला.
याचा परिणाम म्हणून पाच दिवसांपूर्वी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. अजूनही परिसरात बिबटे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे असून जयभवानी रोड परिसरातील रहिवाशांनी शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढला. नेहरूनगर येथील श्री म्हसोबा महाराज मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चेकऱ्यांकडून घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाचे नेतृत्व योगिता गायकवाड, सागर निकाळे, किरण गायकवाड यांनी केले. मोर्चाल श्री तुळजाभवानी माता मंदिराजवळ आला असता नागरिकांनी ठिय्या दिला. अर्ध्या तासाहून अधिक काळ या ठिकाणी रास्ता रोको झाल्याने परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. घटनास्थळी सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. वनविभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
वनविभागावर नाराजी
मागील काही दिवसांपासून बिबट्यांचे हल्ले वाढत आहे. या हल्लात वडनेर दुमाला येथील आयुष भगत चा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच परिसरातील एका बालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांच्या प्रसंगावधनाने बिबट्याला मागील पावली परतावे लागले. बिबट्याच्या हल्लाने भयभीत नागरीकांनी वनविभागावर मोर्चा काढत बिबट्याला जेरबंद करा अन्यथा वनमंत्री यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. सुदैवाने वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले बिबट्या जेरबंद झालाही पण काही दिवसांपूर्वी आर्टिलरी सेंटर येथे दोन वर्षीय श्रृतीक गंगाधर याचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्लामधील बळींची वाढती संख्या पाहता वनविभागाने बिबट्याला ठार मारण्याची परवानगीही सरकारकडे मागितली आहे. सध्य स्थितीत बिबट्या जेरबंद होण्यासाठी संगमनेर, नाशिक सह वेगवेगळ्या भागातून वन पथक काम करत आहे.