"मी शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मला भेटले नाहीत, मी अजित पवारांना...", सत्यजीत तांबेंचं वक्तव्य | Satyajeet Tambe mention Sharad Pawar Ajit Pawar Sanjay Raut Supriya Sule in PC Nashik | Loksatta

“मी शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मला भेटले नाहीत, मी अजित पवारांना…”, सत्यजीत तांबेंचं वक्तव्य

सत्यजीत तांबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना सत्यजीत तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करून घटनाक्रम सांगितला.

Sharad Pawar Ajit Pawar Satyajeet Tambe
शरद पवार, अजित पवार, सत्यजीत तांबे (संग्रहित छायाचित्र)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना सत्यजीत तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख करून घटनाक्रम सांगितला. तसेच आपण शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मला भेटले नाही, असंही नमूद केलं. ते शनिवारी (४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सत्यजीत तांबे म्हणाले, “१२ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मला पहिला फोन प्रभारी एच. के. पाटील यांचा आला. त्यांनी मला विचारलं की काय अडचण आली सत्यजीत. मी त्यांना सर्व प्रश्न सांगितला आणि मी अपक्ष उमेदवारी भरल्याचं सांगितलं. तसेच आपण मला पाठिंबा जाहीर करून टाकावा, अशी मागणी केली. ते म्हणाले ठीक आहे.”

“मी शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण…”

“१६ जानेवारीला माघार आहे. ती माघार झाली की आपण पाठिंबा द्यावा, अशी मी मागणी केली. त्यानंतर मी सर्वांशी चर्चा केली. मी महाविकासआघाडीतील घटकपक्षांशी चर्चा केली. मी संजय राऊतांशी चर्चा केली, शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते मला भेटले नाहीत. मी अजित पवारांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण माझी भेट होऊ शकली नाही. मी सुप्रिया सुळेंच्याही कानावर हा विषय घातला,” अशी माहिती सत्यजीत तांबेंनी दिली.

हेही वाचा : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

“मला दिल्लीतून एक पत्र लिहिण्यास सांगण्यात आलं”

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले, “माझी प्रामाणिक इच्छा होती की, मला महाविकासआघाडीने तातडीने पाठिंबा द्यावा. आम्ही दिल्लीशी संपर्कात होतो. मला दिल्लीतून सांगण्यात आलं की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी पत्र लिहिलं आणि पाठवलं. त्यांनी पत्रात हा शब्द समाविष्ट करा, तो समाविष्ट करा सांगितलं. आमचा पूर्ण एक दिवस ते पत्र अंतिम करण्यात गेला.”

हेही वाचा : ‘आमच्या पक्षश्रेष्ठींनाही बरेच गैरसमज’ ते ‘भाजपाचा पाठिंबा घेणार का?’; काँग्रेस बंडखोर सुधीर तांबेंची महत्त्वाची विधानं

“मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो”

“दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल. मी म्हटलं, माझी काहीच चूक झालेली नाही. ते म्हटले, तरीही माफी मागावी लागेल. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हटलं, मी जाहीर माफीही मागेन, काही हरकत नाही. कारण ज्या पक्षात मी आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून भूमिका घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी माफी मागायलाही तयार झालो,” असंही सत्यजीत तांबेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:07 IST
Next Story
“ही ‘स्क्रिप्टेड स्टोरी’, बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचलं आणि…”, सत्यजीत तांबेंचे गंभीर आरोप