Sharad Pawar on Mahayuti: सरकार कोणत्याही जातीधर्माचे नसावे. सरकार सर्वांचं आणि व्यापक असावं. सरकारने कोणत्याही एका जातीची समिती न करता ती समाजाची करावी. सरकार सर्वांचे असावे. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. सामाजिक ऐक्य जपले गेले पाहिजे. आता या ऐक्यालाच तडा बसत आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने नाशिक येथे पंचवटीतील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे रविवारी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. शिबिराच्या प्रारंभी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्यावरुन निर्माण झालेल्या परिस्थितीवर मत प्रदर्शित केले.

मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप महायुतीच्या अनेक नेत्यांकडून केला जात असल्याच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. आपला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी कवडीचाही सबंध नसल्याचे त्यांनी ताडकन सांगितले. यावर कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही. समाजा-समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. अमूक एकासाठी एक, दुसऱ्यासाठी एक, अशी भूमिका सरकार म्हणून घेणे योग्य नाही. वेगवेगळ्या समाजाच्या समित्या तयार केल्या जात आहेत. सरकार एका जातीचे, एका समाजाचे नाही तर सर्वांचे आहे. एकच समिती असावी, असे आपणास म्हणायचे नाही. समिती कोणत्याही एका जातीची नको, असे आपले म्हणणे आहे. सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सरकार कुठल्याही जातीधर्माचे नसावे. कोणत्याही एका जातीचे राजकारण करणे योग्य नाही. ते आम्हांला शोभत नाही. व्यापक दृष्टीकोन लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दोन समाजांमध्ये अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नाही, असा टोलाही शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना हाणला.

राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. सोमवारी महायुती सरकारविरोधात नाशिक येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद पवार यांची मोर्चालाही उपस्थिती राहणार आहे.