लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक – आपले लग्न व्हावे, चारचौघींसारखा आपला संसार असावा…संसारवेल बहरावी, हे बहुतांश तरुणींचे स्वप्न असते. प्रत्येकीचे स्वप्न प्रत्यक्षात येतेच असे नाही. त्यातही डोक्यावर आईवडिलांचे छत्र नसेल तर हे स्वप्न प्रत्यक्षात येणे अधिकच अवघड. परंतु, येथील शासकीय मुलींच्या अनुरक्षणगृहातील माया नशीबवान निघाली. याच संस्थेचा माजी विद्यार्थी सध्या मुंबई पोलीस दलात कामास असेलेले अंबादास आवळे यांच्याशी तिची लगीनगाठ जुळली आणि वऱ्हाडी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी पालकाची भूमिका निभावली.

माया अवघ्या तीन वर्षाची असताना आईचा मृत्यू झाला. वडिलांनी तिला मनमाड येथील मनोरमा सदनात दाखल केले. त्यानंतर तिचा आणि तिच्या कुटूंबियांचा कधीही संबंध आला नाही. मायाचे शिक्षण मनोरमा सदनात झाल्यानंतर तिला नाशिक येथील मुलींच्या शासकीय अनुरक्षण गृहात दाखल करण्यात आले. याठिकाणी राहून ती कला शाखेत बारावी उत्तीर्ण झाली. संगणक, शिवणकाम, दागिने तयार करणे असे प्रशिक्षण पूर्ण केले. तिच्या शिक्षणाची जबाबदारी, प्रवास खर्च बेजॉन देसाई फाउंडेशनतर्फे करण्यात आला. काही दिवसांपूर्वी तिने संस्थेकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर संस्थेच्या वतीने तिला अनुरूप जोडीदाराचा शोध सुरू झाला. हा शोध संस्थेचा माजी विद्यार्थी अंबादास आवळे याच्याजवळ थांबला.

आणखी वाचा-धुळ्यात जिंदाल स्टीलच्या नावाने बनावट कारखाना, मालक ताब्यात

अंबादास संस्थेचा माजी विद्यार्थी असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. अंबादासनेही संस्थेतील मुलीशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार दोघांची पसंती झाली. कागदत्रांची पूर्ततात, वैद्यकीय तपासणी, चरित्र पडताळणी अहवाल, एचआयव्ही अहवाल, उत्पन्न दाखला, गृहभेट अहवाल हे सारे सोपस्कार पार पडल्यावर महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर माया आणि अंबादास या दोघांचा विवाह झाला. विवाहासाठी तर्पण फाउंडेशनच्या वतीने व्यवस्था पाहण्यात आली. भाजपचे श्रीकांत भारतीय आणि श्रेया भारतीय यांनी कन्यादान केले. महिला बाल विकास विभागाने पालकांची भूमिका निभावत मायाची पाठवणी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of the marriage of a girl from an orphanage and government officials as parents mrj