नाशिक : महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सत्ताधारी मंत्र्यांना सामान्य वाटत असतील तर, लोकांनी त्यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात युवतीवरील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात भाजपचे मंत्री संजय सावकारे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानांचा संदर्भ देत खा. राऊत यांनी सरकारमधील मंत्री असंवेदनशील व बेफिकीर असल्याकडे लक्ष वेधले. केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात निर्भया कांड घडले. तेव्हा भाजपने २१ दिवस संसद ठप्प केली होती. दिल्लीसह संपूर्ण देशात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आता सरकारमधील मंत्री असंवेदशीलपणे वागत असतील तर मग बलात्काराला राजमान्यता द्या, कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करा, अशी उपरोधिक टीका खासदार राऊत यांनी केली. मंत्री पीडितेवर जबाबदारी ढकलत असून असे असंवेदनशील सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्र्यांनी सावकारे आणि कदम यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात पोलीस वा सरकारचा धाक राहिलेला नाही. त्यांच्या मदतीशिवाय नागपूरचा संशयित प्रशांत कोरटकर पळून गेला का, असा प्रश्न राऊत यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा कोरटकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपचे सरकार असणाऱ्या मध्य प्रदेशमध्ये त्याला राजाश्रय मिळाल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray shivsena mp sanjay raut on yogesh kadam and sanjay savkare statement on swargate bus rape case css