जळगाव: निम्न तापी पाडळसरे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा, या मागणीसाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे युवा कार्यकर्ते उर्वेश साळुंखे यांनी शुक्रवारी झाडावर चढून आंदोलन केले.
निम्न तापी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे, या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून आंदोलनाचा इशारा साळुंखे यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रश्नासाठी वेळ द्यावा म्हणून उर्वेश यांनी झाडावर चढून आंदोलन केले. आंदोलन सुरू होताच विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. उर्वेश यांना झाडावरून उतरण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.
हेही वाचा… केळी पीकविम्याचे पैसे देता का, घरी जाता? जळगावात शरद पवार गटाचा शिंगाडा मोर्चा
उपमुख्यमंत्री पवार यांनी लवकरच मंत्रालयात पाडळसे प्रकल्पाबाबतच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनंतर दुपारी उर्वेश झाडावरून उतरले. आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनील पाटील, देविदास देसले आदींनी अमळनेर येथून येऊन पाठिंबा दर्शविला. शेतकरी संघटना, ग्रामसत्ता एक जूठ, एक मूठ, अजिंक्य क्रांती फाउंडेशनसह बुधगाव, अनवर्दे, मालखेडा, वाळकी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रवींद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलीस खात्याचे प्रमोद पारधी, संजय निळे, पोलीसपाटील बापू धनगर उपस्थित होते.