नाशिक : वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले आहे. तर महायुतीच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे. मविआनंतर वंचितनेही मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने नाशिक आणि जळगाव या दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. गायकर यांनी अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली होती. त्यावेळी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा झाली होती. वंचिततर्फे गायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्याची अधिकृत घोषणा पक्षातर्फे करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या लढ्यासह विविध आंदोलनात गायकर हे सक्रिय होते.

हेही वाचा : धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी

महाविकास आघाडीप्रमाणे महायुती मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. हे लक्षात घेऊन वंचितनेही मराठा समाजाच्या व्यक्तीला मैदानात उतरवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाख नऊ हजार ९८१ अर्थात ९.८ टक्के मते मिळवली होती. यावेळी मराठा आंदोलनातील सक्रिय उमेदवाराला उमेदवारी देऊन वंचितने लढत चुरशीची करण्याचे नियोजन केले आहे.