मालेगाव : राज्यात ठिकठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा सूर विरोधकांतर्फे लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील मतदार याद्यांमध्येही ३९३७ दुबार नावे नोंदवली गेल्याची तक्रार पुढे आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे राज्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांची भेट घेण्यात आली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार नावांचा समावेश होणे,ही लोकशाहीची हत्या असल्याची तक्रार यावेळी केली गेली.

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने चोकलिंगम यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निवेदन दिले. सटाणा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ८ऑक्टोबरपासून मतदार याद्यांवरील हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या याद्यांमध्ये काही मतदारांची दुबार व तिबार नावे असल्याचे आढळून आले आहे. ही नावे बघितल्यावर ती विशिष्ट लोकांचे नातेवाईक, हितचिंतक किंवा कार्यकर्ते असल्याची खात्री पटते. काही प्रभागांमध्ये तर अशाप्रकारे ४०० ते ५०० बनावट मतदारांची नावे आढळून आली आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी काही गटांकडून बनावट मतदार तयार करण्याचे हे षडयंत्र असावे, असा संशय पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला.

अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावरील दुबार नावांचा मतदार यादीत समावेश होणे, ही बाब निवडणूक शाखेतील काही अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय होणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज शिष्टमंडळातर्फे व्यक्त केली गेली. एकट्या सटाणा नगरपरिषद निवडणुकीमध्ये ३९३७ नावे दुबार नोंदवली गेली आहेत. मतदार याद्यांमध्ये इतक्या निष्काळजीपणे व आंधळेपणाने नावे नोंदवली जात असतील तर निवडणूक शाखेतील अधिकारी झोपेत होते का, असा प्रश्न शिष्टमंडळातर्फे उपस्थित करण्यात आला. पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, अशी भीती शिष्टमंडळातर्फे व्यक्त करण्यात आली.या शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष भारत काटके, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे,माजी नगरसेवक मुन्ना शेख या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

लोकशाहीसाठी जनजागृती मोहीम..

मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश असणे ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याने ‘मतदार माफिया हद्दपार करा’ या घोषवाक्याखाली शहरात लवकरच जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार पक्षातर्फे करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी,बीएलओ आणि मतदार माफियांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच दुबार व तिबार नावे असलेल्या मतदारांची नावे तातडीने वगळून पारदर्शक मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलन उभारण्यातील येईल, असा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला.