नाशिक – आगामी कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी विशेष (सर्किट) रेल्वेगाडी धावणार आहे. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी लांब पल्ल्याच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू सेवा देण्याची तयारी रेल्वेने केली आहे.
प्रयागराज महाकुंभपर्वात कोट्यवधी भाविकांची गर्दी झाली होती. २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे विभागाने विशेष गाड्यांची संख्या लक्षणियरित्या वाढविण्याची योजना आखली आहे. प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर, रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनील सिंह बिंदू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी सिंहस्थासाठीच्या विशेष गाड्यांवर विचार विनिमय करण्यात आला. देशभरातून नाशिककडे येणाऱ्या यात्रेकरुंसाठी लांब पल्ल्याच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू सेवा दिल्या जातील या गाड्या कामाख्या, हावडा, पटना, दिल्ली, जयपूर, बिकानेर, मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड अशा महत्वाच्या स्थानकांना नाशिकशी जोडतील.
वर्षभर चालणाऱ्या कुंभमेळ्यात रेल्वे स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन हे आव्हान आहे. भाविकांची ये-जा सुकर व्हावी म्हणून प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांना थांबण्यासाठी मोठी जागा उपलब्ध राहील, असे नियोजन केले जात आहे. केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसी टीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असणार आहे. कुंभमेळ्यात प्रवासी वाहतूक सुरळीत राखण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. नाशिक जवळील सर्व रेल्वे स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, ओंकारेश्वरला जोडणार
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात भाविकांना एकाचवेळी तीन ज्योतिर्लिंगांना भेट देता येईल, यासाठी विशेष रेल्वे गाडी ( सर्किट ट्रेन) चालवली जाणार आहे. ही विशेष रेल्वेगाडी त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, आणि ओंकारेश्वर यांना जोडेल. या रेल्वेगाडीने एकाच सहलीत भाविकांना महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथील तीन ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येईल, त्र्यंबकेश्वर (नाशिक) व घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) हे दोन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील असून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्यप्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या काठावर आहे.