नाशिक – महावितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यावरून ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सध्या या सरकारी कंपनीची मक्तेदारी आहे. या पार्श्वभूमीवर, टाटा पॉवरने नाशिकसह ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर तर अन्य खासगी कंपन्यांनी ठाणे, नवी मुंबई, नागपूरमध्ये वीज वितरणचा परवाना मागितला आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना झाल्यावर त्यावर निर्णय होईल. खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने राज्यातील विजेचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील. दुसरे म्हणजे एकापेक्षा अधिक कंपन्या स्पर्धेत असल्याने विजेच्या दरवाढीवर बंधन येईल, याकडे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीकडून लक्ष वेधले जात आहे.
अदानी वीज कंपनीने ठाणे आणि नवी मुंबई, टोरंटने ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि टाटा पॉवरने ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये तर महावितरणने मुंबईमध्ये वीज वितरणचा परवाना मागितला आहे. वीज कायद्यात एकापेक्षा जास्त वीज कंपन्यांना वीज वितरण परवाना देण्याची मुभा आहे. टाटा पॉवरने नाशिकसह इगतपुरी,सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात वीज ग्राहकांना वीज वितरणाची मागणी करण्याचा अर्ज वीज नियामक आयोग व शासनाकडे केला आहे.
वीज वितरण कायदा २००३ नुसार कोणत्याही कंपनीकडून आपण वीज घेऊ शकतो. त्यानुसार महावितरणबरोबरच अदानी, टाटा आणि टोरंट यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणचा परवाना वीज नियामक आयोगाकडे मागितला आहे. यावर सुनावणी होऊन निकाल कालांतराने अपेक्षित असला तरी खासगी कंपन्यांना महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरण परवाना देण्यात येऊ नये म्हणून रान उठले आहे. परंतु, खासगी वीज वितरण कंपन्या महावितरण या सरकारी कंपनीच्या कार्यक्षेत्रात उतरल्या तर विजेचे दर स्पर्धात्मक पातळीवर येतील. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना स्वस्त दराने वीज मिळण्याची दारे उघडी होतील, याकडे ग्राहक पंचायतीकडून लक्ष वेधले जाते. मुंबईत टाटा आणि अदानी या दोन खासगी कंपन्या विजेचा पुरवठा करीत आहेत. त्यामुळे ग्राहक टाटा किंवा अदानी या वितरण कंपनीकडून वीज घेऊ शकतो, याचा दाखला दिला जात आहे.
नाशिकमध्ये एकापेक्षा अधिक कंपन्या वीज वितरण क्षेत्रात उतरल्यास नाशिककरांनाही पर्याय मिळणार आहे ग्राहकांनी त्याचे स्वागत केले आहे. कारण ग्राहकांना भ्रमणध्वनीप्रमाणे वीज जोडणीसाठी ‘पोर्टेबिलिटी‘ मिळणार असल्याने चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे टाटा कंपनीसह अदानी व टोरेंट कंपनीलाही जिल्ह्यात वीज वितरणाची परवानगी द्यावी .अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विलास देवळे, अनिल नांदोडे, दुर्गेश पुराणिक यांनी पत्रकाद्वारे केली. टाटा पॉवरने सादर केलेला अर्ज मंजूर करावा व याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असा आग्रह संबंधितांनी धरला आहे.