लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : राज्यात पटसंख्या कमी झालेली कोणतीच मराठी शाळा बंद होणार नाही. आम्ही त्यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश संबंधित यंत्रणेला सातत्याने दिले आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी शिकविण्याची सक्ती शासनाने आधीच केली आहे. आदेशाचे पालन व्यवस्थित होत आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अमृत ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि शेतकरी मेळाव्यासह जामनेर शहरातील नमो कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात इंग्रजी आणि इतर माध्यमातील शाळांमधील टक्केवारी वाढली असताना मराठी माध्यमाच्या शाळांची टक्केवारी चौथ्या क्रमांकावर गेल्याने पटसंख्या घटल्याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

सुरेश धस यांच्या पुढाकाराने काहींना पोटदुखी

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना भेटणे काही गैर नाही. मस्साजोगचे सरपंच सतीश देशमुख हत्या प्रकरणात धस यांनी सुरूवातीपासून खंबीर भूमिका घेतली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून त्यांचे काम सुरू आहे. अशा स्थितीत संवाद तोडून न टाकता एक आमदार म्हणून त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. देशमुख प्रकरणात धस पुढाकार घेत असल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते दोघांच्या भेटीवर टीका करत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will not allow marathi schools to close due to lack of quorum devendra fadnavis assures mrj