नाशिक – कुस्तीपटू पहिलवान सिकंदर शेख यास अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केल्यापासून त्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील अनेक जण पुढे आले आहेत. असे कटकारस्थान करून सिकंदर शेखची प्रतिमा मलिन करुन त्याला कुस्तीच्या विश्वातून उठवण्याचा प्रयत्न हरियाणा आणि पंजाबातील स्पर्धक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी उपविजेता येवला येथील राजेंद्र लोणारी, पहिलवान भगवान चित्ते यांनी केला आहे.
कोल्हापूरच्या गंगावेश तालीममध्ये घडलेला आणि महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख सध्या वादात सापडला आहे. सिकंदरसह इतरही काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी या संशयितांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असून तो सैन्यात क्रीडा कोट्यातून भरती झाला होता. नंतर त्याने नोकरी सोडली. कला शाखेचा पदवीधर असलेला सिकंदर विवाहित आहे. पाच महिन्यांपासून पंजाबमधील मुल्लांपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता. शस्त्र तस्करी साखळीत त्याने मध्यस्थाची भूमिका निभावल्याचा पोलिसांचा संशय आहे. कोल्हापूरच्या नामांकित गंगावेश तालीममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला सिकंदर शेख असे काही कृत्य करेल, यावर त्याच्या सहकाऱ्यांचा विश्वास बसत नाही.
एका गरीब कुटुंबातून येऊन सिकंदरने आपल्या कष्टाने तालमीत तासंतास घाम गाळून शरीर कमावले, कुस्तीचे मैदान गाजवले, कुस्तीच्या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले. कुस्तीच्या जोरावर तो वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची बक्षीसे मिळवतो, आलिशान मोटारी, दुचाकी अनेक गाड्या त्याने जिंकल्या आहेत.
महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब-हरियाणासह देशभरात ख्याती मिळवलेला हा पहिलवान या अशा छोट्याशा चोरीच्या धंद्यात स्वतःला गुंतवणाराच नाही. त्याला जर असे करायचे असते तर त्याने कुस्तीसाठी एवढी मेहनत कशाला केली असती, असा प्रश्न महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी आणि पहिलवान भगवान चित्ते यांनी केला आहे. सिकंदरला अशा काळ्या धंद्याची गरज नाही. हिंद केसरीची स्पर्धा सहा महिन्यात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेतून सिकंदरला बाद करण्यासाठी हा सुनियोजित कट असल्याचा आरोप लोणारी, चित्ते यांनी केला आहे.
सिकंदर कोल्हापुरातील ज्या गंगावेश तालमीत सराव करतो, त्या तालमीशी आमचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. सिकंदरने प्रामाणिकपणे सराव करून हे यश संपादित केले आहे. तो कुस्तीव्यतिरिक्त अशा कोणत्याही घाणेरड्या धंद्याकडे जाऊ शकत नाही. अशा गुणी पहिलवानाला महाराष्ट्राच्या पुत्राला उत्तर भारतातील कुस्तीमधील गटाने स्पर्धेतून बाद करण्यासाठी कटकारस्थान केले आहे. या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सिकंदरला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करावे, अशी मागणीही लोणारी, चित्ते यांनी केली आहे.
