पनवेल: करंजाडे वसाहतीमध्ये नववी इयत्तेत शिकणा-या विद्यार्थीनीने घरातील गॅलरीमध्ये गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. ही घटना १ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेमध्ये विद्यार्थीनीच्या आईने दोन दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानंतर संबंधित शाळेतील धक्कादायक प्रकार उजेडात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करंजाडे येथील सेक्टर २ मधील एका इमारतीमध्ये आई आपल्या दोन मुलांसोबत राहत होती. स्वत: कामाला जाऊन ती आई मुलांचे शिक्षण व सांभाळ करते. १ नोव्हेंबरला ९ वर्षांच्या मुलाने आईला फोन करुन बहिण घराचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितल्यावर आई काही मिनिटांत घरी पोहचली. स्वत:जवळच्या किल्लीने घराच्या दरवाजाचे कुलूप उघडल्यावर बेडरुमच्या बाहेरील गॅलरीला १४ वर्षांच्या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

हेही वाचा… दिवाळीच्या सुट्ट्या रक्तदानाच्या मुळावर; मुंबईसह नवी मुंबई परिसरात रक्ततुटवडा

कामोठे एमजीएम रुग्णालयात यानंतर मुलीला घेऊन गेल्यावर तेथील डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पनवेल शहर पोलिसांनी मृत्यूनंतर केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. कामोठे येथील ज्या शाळेत मृत मुलगी शिकत होती. तिचा काही दिवसांपूर्वी वर्गातील मुलांनी पिडीत मुलीच्या पाठीवर हात लावतानाचा फोटाे मोबाईलमध्ये काढला होता. त्याखाली अतिशय वाईट शब्दातील पीडित मुलीला बदनाम करणारे मेसेज लिहून हा मेसेज शाळेतील इतर मुलांच्या मोबाईलवर व्हायरल केला होता. पीडित मुलीच्या आईने याबाबत संबंधित मुलांना व त्याच्या काही पालकांना बोलावून याबाबत जाब विचारला. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापिकेपर्यंत तक्रार केली. पुन्हा असे होणार नाही असे मुख्याध्यापिका आणि फोटो काढणारे व मोबाईलवरुन पसरविणा-या पालकांनी शाश्वती दिल्यानंतरही वर्गात पीडित मुलगी गेल्यावर तिला या फोटोबद्दल इतर मुलांकडून विचारणा करण्यात आली.

हेही वाचा… आठ वर्षांच्या अडथळ्यानंतर नवी मुंबईतील जुन्या सांस्कृतिक-सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली येणार

अखेर या सगळ्याला कंटाळून पीडित मुलीने जिवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष्य घातले आहे. भादवी १८६०, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० प्रमाणे या मुलीची बदनामी केल्यामुळे दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणामुळे शाळेत मोबाईल वापर करणा-या मुलांवर अंकुश कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात पीडित मुलीचे फोटो व तिच्याविषयीचा बदनामी करणारे संदेश समाजमाध्यमावर पसरविण्यात आले. पीडित मुलीच्या आईने हा सर्व प्रकार शाळेच्या ध्यानात आणून दिला. तरीही शाळेतील शिक्षक किंवा सूचना करुनही पालक स्वताच्या मुलांचे प्रबोधन करु शकल्याने पिडीतेने आत्महत्येचा मार्ग निवडल्याची चर्चा परिसरात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl student committed suicide due to a viral embarrassed photo in karanjade colony panvel dvr