नवी मुंबई : वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला “कपडे काढून धिंड काढेल” अशी धमकी देण्यात आल्याच्या आरोपावरून भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बॉबी शेख आणि त्यांचा मुलगा यश बॉबी शेख यांच्या विरोधात वाशी आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाशी सेक्टर २८ येथे झालेल्या वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान यश शेखने पार्टीत पीडित मुलीच्या मित्रांना धमकावत “तीला माझ्यासोबत राहू द्या, नाहीतर तिची अब्रू घालवीन” असा इशारा दिला. मुलीच्या मित्रांनी “तीला तुझ्याबरोबर राहणे मान्य नाही” असे सांगताच यश संतापला आणि त्याने आपल्या काही मित्रांना बोलावून पीडित मुलीच्या मित्रांवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दिली असून तिचे वय लक्षात घेता यश शेखवर पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गंभीर गुन्हा नोंदवला आहे. या कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवर धमकी, दबाव, जबरदस्ती किंवा मानसिक त्रास देणे हे प्रकार गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत गणले जातात. आरोपी यश फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, घटनेनंतर आरोपीचे वडील बॉबी शेख यांनी पीडित मुलीच्या मित्रांच्या पालकांना फोन करून तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोपही समोर आला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांत त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाशी पोलिसांनी मारहाणीच्या घटनेचीही स्वतंत्र नोंद घेतली असून धमकावणे, मारहाण आणि जबरदस्ती करणे या संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीमध्ये हा प्रकार मुलीवर दबाव टाकून जबरदस्तीची मैत्री लादण्याच्या उद्देशाने झाल्याचे आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच मालेगावात साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या घटनेने राज्यभर संताप उसळला आहे. पुणे, नाशिक, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी धमक्या, जबरदस्ती आणि लैंगिक शोषणासारख्या गुन्ह्यांची नोंद सातत्याने वाढत आहे. पॉक्सो कायदा कठोर असूनही अशा घटना थांबत नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे समाज, पालक आणि यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.