नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, असा ठराव महाराष्ट्र सरकारने पारित करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, या विषयात जाणूनबुजून संभ्रम पसरविला जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईत बोलताना केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना, अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. यामुळे अनेक राजकीय वाद पेटले आहेत. विरोधक जाणूनबुजून संभ्रम पसरवत आहेत, असा आरोप सत्ताधारी पक्ष करत आहेत. विमानतळाच्या नावाच्या निर्णयाला उशीर होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात उद्घाटनाची घोषणा ३० तारखेला झाल्याने थोडा वेळ लागत आहे. आमच्या सरकारने एकमताने दि.बा. पाटील यांचे नाव ठरवले असून तो ठराव केंद्र सरकारकडे पाठवला आहे, असे प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी ती मागणी मान्य केली नव्हती. या मागणीसाठी आम्ही अनेक आंदोलने केली, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. नंतर ठाकरे सरकार कोसळले आणि बहुमत नसतानाही सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय कायदेशीर ठरत नाही. त्यानंतर,आमचे सरकार आल्यानंतर विधानसभेत आणि विधान परिषदेत एकमताने हा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. तरी, देखील राजकीय हेतूने विरोधक आंदोलन करत आहेत आणि संभ्रम पसरवत आहेत,” असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी केला.
“विमानतळासाठी आणखी दोन नावे आहेत असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले हे चुकीचे आहे. राज्य सरकारकडून फक्त दि.बा. पाटील यांचेच नाव सुचवले गेले आहे. दुसरे कोणतेही नाव केंद्राकडे गेलेले नाही. समाजात संभ्रम निर्माण करण्यामागे त्यांचा उद्देश काय, हे म्हात्रे यांनी स्पष्ट करावे,” असेही ठाकूर म्हणाले. “विमानतळ सुरू होण्यापूर्वी नाव निश्चित व्हावे यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. दि.बा. पाटील यांचेच नाव या विमानतळाला दिले जाईल, इतर कुठल्याही नावाला जागा नाही,” असे प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.