नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचा केंद्रबिदू ठरलेल्या नवी मुंबईत भाजपचाच महापौर व्हायला हवा अशी ठाम भूमीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांनी मांडल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. महायुती करायची की नाही यासंबंधीचा निर्णय स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र बसा आणि आम्हाला कळवा. त्यावर योग्य तोच निर्णय घेतला जाईल. मात्र नवी मुंबईसारख्या शहरात भाजपचा महापौर व्हायला हवा अशाचपद्धतीची आखणी करायला हवी, अशा सूचना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी दिल्याने आगामी काळात शिंदे नाईक संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी दोन आठवड्यांपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीतील फॅाच्युन हाॅटेलमध्ये पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला होता. या बैठकीत त्यांनी नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याचे आनंद दिघे यांचे स्वप्न होते. दिघे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची वेळ आता आली आहे, असे सूचक वक्तव्य केले होते. ‘ या निवडणुकीत युती होईल की नाही ते आम्ही ठरवू. त्याचा विचार तुम्ही करु नका. तुम्ही आपआपल्या प्रभागांमध्ये काम करा. काहीही झाले तरी नवी मुंबईवर यंदा दिघे साहेबांच्या स्वप्नातला भगवा फडकावयाचा आहे’ अशा शब्दात शिंदे यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत आक्रमक भूमीका घेतल्याचे पहायला मिळाले.
शिंदे-नाईक संघर्ष तीव्र
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यापासून त्यांनी नवी मुंबईवर पकड निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते गणेश नाईक आणि त्यांच्यामधील संघर्ष वाढू लागला आहे. नाईक यांच्याकडे भाजपने यंदा वन मंत्री पद सोपविले. तेव्हापासून नाईक संधी मिळेल तेव्हा शिंदे यांना लक्ष्य करतात. भाजपच्या एका बैठकीत नाईक यांनी ‘ ठाण्यात सत्ता मिळवायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करायला हवे’ असे वक्तव्य केले. त्यामुळे शिंदे आणि नाईकांदरम्यान कटुता आणखी वाढल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नाईकांना धक्का द्यायचा अशीच शिंदे यांच्या पक्षाची रणनिती दिसते. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच शरद पवार यांच्या पक्षातील माजी नगरसेवक, प्रभावी पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याची रणनिती शिंदे यांनी आखली आहे.
भाजपच्या बैठकीत एकला चलोरेचा सुर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम जवळ येऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वेगवेगळ्या भागातील पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरु केली आहे. शनिवारी दिवसभर हे दोन नेते कोकण प्रातांतील पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांशी संवाद करताना पहायला मिळाले. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण भागातील स्थानिक पुढाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची मते त्यांनी जाणून घेतली. यावेळी नवी मुंबईचाही विषय प्राधान्याने निघाला. नवी मुंबईत भाजपचा महापौर होईल अशीच परिस्थिती असल्याचे यावेळी स्थानिक नेत्यांनी उपस्थित नेत्यांना सांगितल्याचे समजते. त्यावर नवी मुंबईसारख्या शहरात भाजपचा महापौर व्हायला हवा. अशाच पद्धतीने आखणी करा, अशा सूचना या नेते आणि निवडक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. युती संबंधी स्थानिक पातळीवर आधी चर्चा करा. कोणत्या जागा आपल्याला मिळायला हव्यात. मित्र पक्षाचे माजी नगरसेवक असलेल्या जागांवर सध्याची परिस्थिती काय, या सर्वाचा एकत्रित अभ्यास करुन आमच्यापुढे मांडा, अशा सूचनाही या मंडळींना देण्यात आल्या. यावेळी नवी मुंबईतील राजकीय स्थिती पक्षाला पोषक असून आपलाच महापौर होईल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केल्याचे समजते.