उरण : मंगळवारी उरणमध्ये सुरू असलेल्या संततधारे मुळे न्हावा शेवा पोलीस ठाण्यात पाणी साचले होते. जेएनपीए बंदर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात येथील नैसर्गिक नाले बुजवून रेल्वे आणि रस्ते मार्ग उभारण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे न्हावा शेवा पोलीस ठाणे हे रस्त्याच्या उंची पेक्षा कमी पातळीवर आहे. त्यामुळे दरवर्षी या पोलीस ठाण्यात पाणी शिरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास उशीर लागत आहे.
अगदी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे व समुद्राच्या भरतीचे पाणी ही शिरू लागले आहे. मंगळवारी दुपारी समुद्राच्या भरतीची वेळ होती.त्यामुळे पावसाचे आणि समुद्राच्या भरतीचे पाणी यांचा मेळ झाल्याने हे पाणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात शिरला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेएनपीए बंदरा लगत असलेल्या उड्डाणपूला खाली हे ठाणे आहे. खाडीवर वसलेल्या ठिकाणी खोलगट भागात हे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. या ठाण्याच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. उरण मधील अनेक मार्ग हे पाण्याखाली गेले आहेत. हे पोलीस ठाणे ही रस्त्याच्या कडेला असल्याने त्याचाही परिणाम झाला आहे.