नवी मुंबई : आशियातील सर्वात मोठी आद्योगिक वसाहत म्हणून नावाजली गेलेली नवी मुंबई लगत असणारी ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल बेल्ट मधील अंतर्गत रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले असून नेरुळ कडून तुर्भे आणि महापे कडून रबाळे कडे जाणारा मार्ग सकाळच्या धुवाधार पावसात जवळपास बंद झाला होता. यापूर्वीही मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मनपा आणि एमआयडीसी विभागाने त्रुटी दूर केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र पुढे काहीही कारवाई न केल्याने आज सर्व रस्ते जलमय झाले आहेत.
नवी मुंबई लगत असणारी आद्योगिक वसाहत हि आशयातील सर्वात मोठी असून ठाणे बेलापूर इंडस्ट्री बेल्ट म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई मनपा आणि एमआयडीसी तील कारखाना दार यांच्यात सुमारे दीड दशक मालमत्ता कर देण्यावरून झालेला वाद सर्वोच्च न्यायालय पर्यंत पोहचला होता. ज्यात नवी मुंबई मनपाची सरशी झाली होती. या मालमत्ता कर नवी मुंबई मनपा कडे जमा करणे सुरु झाले आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे मनपाला क्रमप्राप्त झाले. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत सुमारे १३६ किलोमीटरचे रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण मनपाने केले तर रबाळे भागांतील २१ किलोमीटरचे रस्ते एमआयडीसी विभागाने करण्यास घेतले. मनपाने रस्ते बनवून झाले असले तरी हे काम नियोजन शून्य असल्याने पाण्याचा निचरा होणारी छिद्र हि अनेक ठिकाणी रस्त्यांच्या पेक्षा उंच झाली आहे. परिणामी पाऊस झाली कि रस्ते जलमय होतात. या वर्षी मे महिन्यातच दोन आठवडे जोरदार पाऊस झाला. यावेळीही सर्वत्र पाणी साठले होते. तेव्हा हि त्रुटी दूर करू असे आश्वासन मनपाने दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले असल्याचे दोन दिवसांच्या जोरदार पावसाने उघड झाले आहे.
आज पहाटे सुमारे दोन तास अति मुसळधार पाऊस झाल्याने सकाळी सकाळी नेरुळ शिरवाने भागातून एमआयडीसी भागात जाण्यासाठीचा रस्ता, महापेतुन रबाळे दिघा कडे जाणारा रस्ता आणि तुर्भे कडून एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुढगाभर पाणी साठले होते. पावसाचा अधिक जोर डोंगरावरून जोरदार पणे खाली उरणारे पाणी आणि त्यात पाण्याचा निचरा होणारी छिद्रे छोटी आणि रस्त्याच्या पातळी पेक्षा उंच असल्याने हि परिस्थिती ओढवली . त्यामुळे हे मार्ग सकाळी सुमारे एक ते दीड तास जवळपास ठप्प पडले होते. जड अवजड वाहने यातून मार्ग काढून जात होते. मात्र हलकी वाहने पाण्यात घालण्यास चालक धसावत नव्हते.
नैर्सर्गिक नाल्यावरील अतिक्रमण भोवले.
एमआयडीसीच्या एका बाजूला नवी मुंबई शहर तर दुसऱ्या बाजूला पारसिक डोंगर रांग आहे. पावसात याच डोंगरावरून येणारे पाणी थेट खाडीत जाण्यासाठी ठिकठिकाणी नैसर्गिक नाले आहेत. मात्र या नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने डोंगरावून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याने पाणी थेट रस्त्यात घुसले परिणामी रस्ते जलमय झाले. परिस्थिती वर आम्ही नियंत्रण ठेऊन असून काही दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. अशी प्रतिक्रिया आपत्कालीन विभागाने दिली आहे.