नवी मुंबई : ड्रग्समुळे आपण आपले शरीरच नव्हे, तर देशाची राष्ट्रीय घडी उद्ध्वस्त करत आहोत आणि देशाच्या सुरक्षेशी खेळ करत आहोत, असे वक्तव्य समीर वानखेडे यांनी नवी मुंबईत बोलताना केले. नवी मुंबई येथे ड्रग फ्री फाऊंडेशनतर्फे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ड्रग्सचे सेवन आरोग्यासाठी तसेच आपल्या देशासाठी कसे धोकादायक आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्स हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नसून देशाच्या सुरक्षेशी निगडित गंभीर विषय आहे, असे समीर वानखेडे यावेळी म्हणाले. मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा परिसरात ड्रग्सच्या आहारी जाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे सोशल मिडियाचा प्रभाव, मित्रमंडळींचा दबाव, साहसवाद यांसारखे घटक याला कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. शाळा आणि महाविद्यालयांजवळ जनजागृती करून कोणते पदार्थ बंदीस्त आहेत आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आपले शरीर हे मंदिरासारखे स्वच्छ असते, त्यात बाहेरून कोणतेही घातक पदार्थाचे सेवन केले तर ते धोकादायक असते. ड्रग्समुळे केवळ आपले आरोग्य बिघडत नाही तर, नारकोटेरिझमला खतपाणी घालून आपण आपलेच पैसे शत्रूराष्ट्रांकडे पोहोचवत आहोत. ते त्याच पैशांचा वापर भारताविरोधात होणाऱ्या हल्ल्यांसाठी करतात. त्यामुळे तरुण पिढीला समजले पाहिजे की, ड्रग्ज चे सेवन किती धोकादायक आहे, असे समीर वानखेडे म्हणाले. ड्रग्समुक्ती साठी शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. जसे तंबाखुमुक्त मोहीम राबविली जाते. त्यानुसार ड्रग्समुक्त मोहीम शाळा महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये राबविल्या पाहिजेत, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.