नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-१ येथे चार महिन्यांहून अधिक काळ झाकून ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज अचानक अनावरण केल्याने नवी मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
स्मारकाचे काम पूर्ण होऊनही केवळ राजकीय श्रेयवादामुळे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रखडले असल्याचा आरोप शिवभक्तांकडून केला जात होता. मागील चार ते पाच महिन्यांपासून हा पुतळा झाकून ठेवण्यात आला होता. या पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करावे अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून शिवभक्तांकडून करण्यात येत होती. याबाबत प्रशासनाला अनेकदा इशाराही देण्यात आला होता.
दसऱ्यालाही लोकार्पण न झाल्याने विभागातील शिवभक्त संघटनांनी दिवाळीपूर्वी उद्घाटन न झाल्यास पाडव्याला स्वतः अनावरण करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. प्रशासनाकडून हे अनावरण जाणीवपूर्वक प्रलंबीत ठेवले जात असल्याचा आरोप शिवभक्त संघटनांकडून करण्यात आला होता.
आज रविवारी, अखेर मनसेने पुढाकार घेत महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून, हळदी-कुंकू व फुलहार अर्पण करून अमित ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचे विधिवत अनावरण करण्यात आले. यावेळी शिवस्मरकाजवळ शिवभक्त, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने चौकात जयजयकाराचा जल्लोष उसळला.
अमित ठाकरे हे आपल्या नियोजित दौऱ्यावर नवी मुंबईत आले होते. यावेळी मनसेच्या नवीन शाखांचे उद्घाटन केल्यानंतर नेरुळ येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकातील पुतळ्याकडे पोहोचले तेव्हा शिवभक्तांकडून “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर शिवभक्तांनी पुतळ्याकडे जात त्यावरील कापड हटवून महाराजांच्या पुतळ्याला मोकळे केले. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचे चरण धुत विधिवत पूजा करून अमित ठाकरेंनी पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी प्रशासन आणि राजकीय नेत्यांवरही अमित ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र सोडले.
सरकारवर थेट टीका
अनावरणानंतर अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी वेळ नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” ” या दोघांनाही महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.” अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. तसेच “यामुळे माझ्यावर कारवाई झाली तरी हरकत नाही; महाराजांसाठी अशा अनेक केसेस घेण्याची तयारी आहे,” असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकारसोबतच स्थानिक पातळीवरील राजकीय नेते आणि मनसे यांच्यात वादाला ठिणगी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाची भूमिका अधिकच संभ्रम निर्माण करणारी
लोकार्पणाची जबाबदारी नक्की कोणाकडे, याबाबत महापालिका प्रशासनातच विसंगत भूमिका दिसत होती. अभियंता विभागाने काम पूर्ण झाल्याचे सांगूनही पुतळ्याचे लोकार्पण झालेले नव्हते. तर महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने हे काम शहर अभियंत्यांच्या अखत्यारीत असल्याचा दावा केला होता. या परस्परविरोधी भूमिका आणि जबाबदारी ढकलण्याच्या पद्धतीने शिवभक्तांमध्ये संभ्रम अधिकच बळावला होता. मात्र, आता अमित ठाकरेंनी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याने शिवभक्तांमध्ये एकच जल्लोष दिसून आला.
अमित ठाकरे यांच्या पुतळा अनावरणामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘शिवाजी महाराज स्मारक’ हा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याने इतर राजकीय पक्ष स्थानिक राजकारणात या मुद्द्यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
