नवी मुंबई– नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला व त्या ठिकाणी शिवपुतळा बसवल्यानंतरही मागील अनेक महिने उद्घाटनाविना पुतळा झाकून ठेवण्यात आला होता.

आज ( ता.१६) दुपारी २.२४ मिनिटांनी मनसेने अमित ठाकरे, गजानन काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसह पोलीसांचा विरोध झुगारत पुतळ्याचे अनावरण करत शिवरायांचा जयघोष केला. परंतू नियमाबाह्य या पुतळ्याचे अनावरण केले असल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठांच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी लोकसत्ताला दिली आहे.

नेरुळ सेक्टर १ येथील शिवाजी चौकात आकर्षक देखाव्यांसह मेघडंबरीमध्ये जवळजवळ ४६ लाख ८५ हजार रुपये खर्चातून शिवयांचा सिंहासनारुढ पुतळा सज्ज केला होता.परंतू पालिकेकडून उद्घाटन केले जात नव्हते. त्यानंतर आर आर पाटील उद्यानात ठेवण्यात आलेला पुतळा मेघडंबरीत रात्रीच्या अंधारात आणला परंतू अनेक महिने ह्या पुतळ्याला मुहूर्त मिळत नव्हता .त्यामुळे पालिकेला नक्की कोणता मुहूर्त हवा असा संतप्त सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला होता.मागील वर्षी १९ फेब्रुवारी २०२४ पासून पुतळ्याचे उद्घाटन करण्याची मागणी शिवप्रेमीकडून केली जात होती.

शिवरायांचा पुतळा आणून आर आर पाटील उद्यानात ठेवला होता.त्यानंतर शिवप्रेमींच्या सततच्या मागणीवरुन पुतळा मेघडंबरीत आणून ठेवला होता. पालिका अभियंता विभागाकडून नेरुळ येथील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आली. तसेच नेरूळ येथील चौकात शिवरायांच्या मावळ्यांचा आकर्षक देखावाही साकारण्यात आला. परंतू शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळ्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतरही उद्घाटन केले जात नव्हेत.

शिवपुतळा व सौंदर्यीकरणासाठी जवळजवळ १ .०६ कोटीपेक्षा अधिकचा खर्च पालिकेने केला आहे. शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा निर्मितीसाठी जवळजवळ ४६ लाखांपेक्षा अधिकचा खर्च आला आहे.

पोलीसांनी हस्क्षेप केल्यानंतरही मनसे पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पुतळा अनावर दुपारी २ वाजून २४ मिनिटांने केले आहे. – ब्रम्हानंद नाईकवाडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ

मनसेने नेते अमित ठाकरे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पालिकेच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागले आहे. पोलीसांनी गुन्हे दाखल करावेत.महाराजांसाठी असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. – गजानन काळे, मनसे जिल्हाध्यक्ष ,नवी मुंबई</strong>

पोलिसांचेही पालिकेला पत्र….

शिवपुतळ्याचे लवकरात लवकर उद्घाटन करावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल याबाबतचे पत्र नेरुळ पोलीसांकडून नवी मुंबई महापालिकेला दिले होते.

पालिकेची चूक… वारंवार दुर्लक्ष…

महाराष्ट्राचे व देशाचे श्रध्दास्थान असलेल्या शिवरायांचा आकर्षक व देखणा सिंहासानारुढ पुतळा उभारण्याची मागणी मी सुरवातीपासून केली होती व पुतळा उभारण्यात आला.पालिकेला नक्की कोणता मुहूर्त साधायचा होता..पालिकेची १०० टक्के चूक आहे.तर मनसेनेही नागरीकांना सांगून भव्य स्वरुपात आपल्या राजाचे उद्घाटन करायला हवे होते. – देवनाथ म्हात्रे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट.

मनसे नेते अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल , नेरूळ पोलिसांनी केला गुन्हा दाखल .

नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. आज नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेता या पुतळ्याचे लोकार्पण केल्याने नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे . गुन्हा दाखल होणार असल्याची कल्पना अमित ठाकरेंना होती त्यावर भाष्य करताना अशा कार्यासाठी झालेला हा माझ्यावरील पहिला गुन्हा असेल व त्याचा मला आनंदच असेल असं अमित ठाकरे म्हणाले होते.