नवी मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आरक्षण सोडत देखील पार पडली आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मंगळवारी प्रभाग आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये दहा प्रभागांमधील ठरावीक जागा अनुसूचित जातींसाठी तर दोन प्रभागांमधील जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आरक्षण सोडतीत १११ पैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिलाराज असल्याचे बोलले जात आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेचा महापौर कोण असणार यावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र होते. यामध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा महापौर नसेल असे विधान करत वनमंत्री गणेश नाईक(ganesh naik) यांना टोला लगावला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर गेल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरू झाली आहे. अशाच मंगळवारी महापालिकेने आरक्षण सोडत जाहीर केले. यामध्ये ५६ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. यावर बोलत असताना मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून त्या सक्रिय राजकारणात आहे. पहिली नगरसेविका होण्याचा मान देखील मिळाला.
आता ३० वर्षांनंतर पुन्हा महिला नेतृत्वाचं नवं पर्व सुरू होत आहे. ५६ जागांवर ५६ नगरसेविका निवडून येणार असल्याने अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरपदाचं आरक्षण महिलांसाठी आलं, तर नवी मुंबईत महिलाराज आल्याशिवाय राहणार नाही असे विधान त्यांनी केले. पूर्वी निर्णय घेण्याचं काम पुरुषांच्याच हातात असायचं, पण आता ते चित्र बदलत आहे. गेल्या २५ वर्षांत मी अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई केली असून अनेक अधिकारी पकडून दिले आहेत. महिला आल्यास भ्रष्टाचारमुक्त व विकासाभिमुख प्रशासन घडेल, याची खात्री देखील त्यांनी व्यक्त केली.
घराणेशाहीचा महापौर नसणार
नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “महापौरपद कोणत्याही घराण्यातील नातेवाईकांना मिळू नये. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच मिळालं पाहिजे. मी स्वतः गेली २५ वर्ष माझ्या घरातील कुणालाही नगरसेवकपदासाठी उभं केलं नाही, कारण मला घराणेशाही मोडायची आहे. मात्र, आता लोकांचा आग्रह असल्याने गरज भासल्यास माझ्या घरातील सदस्य उभे राहतील, पण महापौरपदासाठी नाही. या निवडणुकीत नवी मुंबईत महिला महापौर व्हायला हवी. पण ती कुठल्याही घराण्याची नसून सर्वसामान्य कार्यकर्ती असावी. असे म्हणत नवी मुंबई पालिकेवर भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ताच महापौर होणार असे म्हणत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना टोला लगावला आहे.
