MaharashtraFloods नवी मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनस्तरावर मदतीचे आवाहन करण्यात आले असून, सामाजिक संस्थांबरोबरच अनेक स्वयंसेवी संघटना आणि व्यापारी वर्गही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. विशेषतः मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी पुरपरिस्थिती उद्भवली होती. या पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शासनस्तरावरुन करण्यात आले आहे. त्यानुसार, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटनांकडून या पुरग्रस्तांना मदत पाठवली जात आहे. आता, यांच्यासोबतच व्यापारी वर्ग देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितितील फुल, फळ, भाज्या तसेच धान्य विक्रेते व्यापाऱ्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.

मुंबई एपीएमसी फळ मार्केट व्यापारी वर्ग आणि सर्व असोसिएशन तर्फे २५लाख रुपयापर्यंत पुरग्रस्तनिधी निधी गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत फळ मार्केट आणि असोसिएशनच्या माध्यमातून १७ ते १८ लाख रुपयांपर्यंत निधी गोळा करण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. तसेच इतर फुल, फळ, भाज्या तसेच धान्य विक्रेते व्यापाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून ही मदत स्विकारली जात आहे. आतापर्यंत ३० हून अधिक जणांनी पुरग्रस्तांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये व्यापारी आणि असोसिएशनचा सहभाग आहे. सोमवारपर्यंत हा मदतीचा ओघ काय सुरु राहणार आहे. त्यानंतर, मंगळवारी पहिली मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली.