पनवेल : लग्नाचे आमिष दाखवून कामोठे येथील ४० वर्षीय महिलेची तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात​ बुधवारी ​फसवणूकीचा ​गुन्हा दाखल करण्यात आला ​आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,​कामोठे येथील सेक्टर १९ मध्ये राहणा-या​ पीडित महिलेने २०१८ मध्ये ​एका ​मॅट्रिमोनियल​ कंपनीच्या संकेतस्थळावर​ त्यांची वैयक्तिक माहिती संकलित केली होती. याच संकेतस्थळावर ४० वर्षीय ​निलेश निफाडे पाटील​ याची पीडितेसोबत ओळख झाली. निलेश हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ​शिरवाडे वणी​ या गावात राहणार आहे. ​

​निलेशने स्वताला ओळख करताना व्यावसायिक असल्याचे सांगून महिले​चा विश्वास संपादन के​ला. त्यानंतर त्याने लग्नाचे आश्वासन देत जून २०१८ ते जून २०२२ या काळात पुणे रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार भेटी घेतल्या. त्यादरम्यान त्याने “व्यवसायातील गुंतवणुकीसाठी पैसे लागतील” असे सांगून वेळोवेळी ​१६ लाख रुपये​ पीडितेकडून घेतले. मात्र, पैसे​ पुन्हा कधी मिळतील अशी पीडितेने विचारणा केल्यावर “आज देतो, उद्या देतो” असे सां​गून तो टाळाटाळ करत ​होता. अखेर अनेक महिन्यांचा अनुभवानंतर पीडितेला त्यांची फसवणूक ​झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी​ पीडित महिलेच्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे यांनी​ बुधवारी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका खरटमल करत आहेत. प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची सुरूवात पुणे रेल्वे स्टेशन परिसरात झाल्याचे निष्पन्न झाल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी​ पुणे येथील ​बंडगार्डन पोलीस ठा​ण्यात वर्ग करण्यात आ​ल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली. ​