नवी मुंबई : वेग, प्रकाश आणि रोमांचाचा संगम नवी मुंबईच्या रस्त्यांवर अवतरणार आहे. यंदा डिसेंबरच्या थंडीत नवी मुंबईकरांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॉर्म्युला नाईट रेसिंगचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पाम बीच रोडवर उभारण्यात येणाऱ्या ३.७५ किमी लांबीच्या विशेष स्ट्रीट सर्किटवरून रात्री पथदिव्यांच्या उजेडात वेगवान गाड्या झेपावणार आहेत. त्यामुळे नेरुळ तलावाच्या काठावरून जाणाऱ्या या ट्रॅकवरून हे दृश्य पाहणे नवी मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
रेसिंग प्रोमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड (RPPL) आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या कराराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राला ‘आशियाची मोटरस्पोर्ट्स राजधानी’ बनविण्याचा संकल्प या माध्यमातून पुढे येत आहे. या स्पर्धेत ‘इंडियन रेसिंग लीग’ आणि ‘FIA फॉर्म्युला-४ इंडिया चॅम्पियनशिप’चा अंतिम टप्पा नवी मुंबईत पार पडणार असून, देशातील सहा शहरांतील संघ यात सहभागी होणार आहेत.
३.७५ किमीचा प्रकाशमय ट्रॅक
पाम बीच रोडवर उभारण्यात येणारा ३.७५ किलोमीटर लांबीचा FIA-ग्रेड स्ट्रीट सर्किट तब्बल १४ वळणांचा असेल. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उभारण्यात येणाऱ्या या ट्रॅकवर गाड्यांचा वेग आणि रात्रीच्या वेळचा दिव्यांचा झगमगाट प्रेक्षकांसाठी अनोखा अनुभव देणार आहे.
परवानग्यांचा कडेकोट अडसर
चेन्नई आणि हैदराबाद येथे याआधी झालेल्या नाईट स्ट्रीट रेसला न्यायालयीन अडथळे आणि तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. FIA मान्यता, ट्रॅक सुरक्षा, आपत्कालीन सेवा, ध्वनी व प्रकाश प्रदूषण नियंत्रण या बाबींवर न्यायालयाने कडक अटी घातल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबईतील स्पर्धेसाठीही वाहतूक विभाग, पोलिस, अग्निशमन दल, पर्यावरणीय विभाग आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत विशेष परवानग्या घेणे आयोजकांना बंधनकारक असणार आहे.
पाम बीच रोडवर पथदिव्यांच्या उजेडात धावणाऱ्या गाड्यांची गर्जना, तलावाच्या काठावरून झेपावणारा ट्रॅक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उलगडणारा वेगाचा थरार—हा अनुभव नवी मुंबईकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच होणाऱ्या या फॉर्म्युला नाईट रेसिंगमुळे शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असून, मोटरस्पोर्ट्स चाहत्यांसाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने रोमांचकारी ठरणार आहे.