Inauguration of Navi Mumbai Airport नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा (NMIA) चे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (Adani Airports Holdings Ltd ची उपकंपनी) आणि सिडको (City and Industrial Development Corporation) यांच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. लंडनस्थित झहा अदीद या जगविख्यात वास्तूविशारद कंपनीने (Zaha Hadid Architects) या विमानतळाचे डिझाइन केले आहे. भारताचे राष्ट्रीय फुलावर म्हणजेच कमळावर आधारित, स्टील आणि काचेपासून तयार केलेले “फ्लोटिंग लोटस” हे या या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण असणार आहे. असे असले तरी केवळ डीझाईन ही एकमेव गोष्ट या विमानतळाला वेगळे ठरवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुती सरकारसाठी हा महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. उद्धाटनापुर्वीच या विमानतळाबद्दलच्या काही गोष्टी पुढे आल्या आहेत. जाणून घेऊया उद्धाटनानंतर कशापद्धतीची आखणी प्रवाशांना पहायला मिळेल.

पहिले उड्डाण डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी NMIA चे उद्घाटन होणार आहे. मात्र, या विमानतळावरुन पहिले उड्डाण डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. कोणती एअरलाईन पहिली उड्डाणे घेईल याविषयी स्पष्टता नसली तरी इंडिगो कंपनीचे विमान येथून पहिल्यांदा आकाशात उड्डाण घेईल असे बोलले जात आहे. एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर या तीन विमान कंपन्यांनी अदानी कंपनीसोबत करार केले आहेत. त्यामुळे विमानतळावरुन पहिले व्यावसायीक विमान कोणत्या कंपनीचे असेल याविषयी उत्सुकता कायम आहे.

चार मोठी प्रवेशद्वारे, तीन महत्वाची केंद्र

या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलला चार महत्वाची प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच तीन महत्वाची केंद्र येथे असतील. या केंद्रांना अल्फा, ब्रावो आणि चार्ली अशी नावे देण्यात आली आहेत. जे सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांचे व्यवस्थापन करतील. एकूण ८८ चेक-इन काउंटर असतील, ज्यापैकी ६६ पारंपरिक स्वरूपातील (एअरलाईन स्टाफच्या मदतीने बोर्डिंग पास आणि चेक-इन) आणि २२ सेल्फ-चेक-इन काउंटर असतील. ही व्यवस्था देशातील मोठ्या विमानतळांपैकी एक असल्याचे सांगितले जाते.

सुरुवातीला उड्डाणे सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत

सुरुवातीच्या एका महिन्यासाठी उड्डाणे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत चालतील. विमानतळाची एकूण क्षमता प्रति तास ४० एटीएम्स (Air Traffic Management — विमान हालचालींचे नियंत्रण) आहे, पण सुरुवातीला ही क्षमता १० एटीएम्सवर चालवली जाईल. म्हणजेच दर तासाला १० विमानांना लँडिंग किंवा टेकऑफची परवानगी असेल. एअरलाईन्स लवकरच त्यांच्या मार्गांची व तिकिट विक्रीची घोषणा करतील.

४ टर्मिनल्स, २ समांतर धावपट्ट्या

NMIA मध्ये चार टर्मिनल्स आणि दोन समांतर धावपट्ट्यांचा (Runway 1 – लांबी ३,७०० मी./रुंदी ६० मी. आणि Runway 2 – लांबी ३,७०० मी./रुंदी ६० मी.) आराखडा आहे. मात्र, सध्या फक्त एक धावपट्टी आणि एकच टर्मिनल कार्यरत असेल. दुसऱ्या टर्मिनलचे डिझाइनिंग सुरू झाले आहे आणि अदानी समूह या दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी ₹३०,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ₹२०,००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

-. ‘आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र’ म्हणून विकसीत करण्याचे उद्देष

NMIA ला दुबई किंवा हिथ्रो विमानतळासारखे “आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र” बनवण्याचा हेतू आहे. सध्या २० दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष (MPPA) हाताळण्याची क्षमता असलेल्या या विमानतळाचे लक्ष्य ९० MPPA पर्यंत वाढवण्याचे आहे आणि युरोप व अमेरिकेतील प्रमुख ठिकाणांसाठी थेट उड्डाणे देणारा एक ‘वन-स्टॉप’ हब बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

शांघायप्रमाणे कार्गो हबची योजना

देशातील सर्वात मोठे MRO (Maintenance, Repair and Overhaul) केंद्र बनवण्याचे आणि शांघायप्रमाणेच कार्गो हब निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रारंभिक टप्प्यात या विमानतळाची कार्गो क्षमता दरवर्षी ०.५ दशलक्ष मेट्रिक टन (MMTPA) आहे, जी अंतिम टप्प्यात ३.२ MMTPA पर्यंत वाढवली जाईल.

विशेष लँडिंग प्रणाली

NMIA मध्ये Category II Instrument Landing System (ILS) वापरले जाणार आहे, ज्यामुळे पायलट्स कमी दृश्यमानतेतही सुरक्षित लँडिंग करू शकतील. ही प्रणाली ३०० मीटर रनवे व्हिज्युअल रेंज (RVR) वर कार्यक्षम आहे — म्हणजे धुके, पाऊस किंवा इतर हवामानातील अडचणींमध्येही लँडिंग शक्य होईल. याच्या तुलनेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान ५५० मीटर RVR आवश्यक आहे.

जेन Z आणि मिलेनियल्स ६४% प्रवासी

अधिकाऱ्यांच्या मते, आजचे ६४ टक्के प्रवासी जन Z आणि मिलेनियल्स आहेत, जे तंत्रज्ञानप्रेमी आहेत. यानुसार, सर्व बोर्डिंग गेट्स Digi Yatra-सक्षम असतील आणि Trusted Traveller Programme च्या माध्यमातून इमिग्रेशन रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. गेट्सच्या बाहेर प्रतीक्षा वेळेचीही रिअल-टाइम माहिती दिली जाईल.

फूड कोर्ट नव्हे, ‘फूड हॉल’

NMIA मध्ये पारंपरिक फूड कोर्टऐवजी “फूड हॉल” संकल्पना असेल. प्रवाशांना प्रत्येक किऑस्कवर जाऊन ऑर्डर देण्याची गरज नाही. ते एका वेळी अनेक आउटलेट्समधून प्री-ऑर्डर करू शकतील आणि एकाच डिलिव्हरीत सर्व पदार्थ मिळतील. येथे Wagamama आणि Coco Cafe by Coco Cart सारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्ससोबत Bombay Bond ही चार लोकप्रिय ब्रँड्सची क्लस्टर संकल्पना असेल — KMC, Bombay Brasserie, Bayroute आणि Foo. ही चारही रेस्टॉरंट्स एकाच आसनव्यवस्थेत सामायिक असतील, त्यामुळे प्रवासी कोणत्याही ब्रँडमधील पदार्थ मिसळून ऑर्डर करू शकतील. याशिवाय, विमानतळाच्या विशेष अॅपद्वारे प्रवासी थेट बोर्डिंग गेटवर खाद्यपदार्थ मागवू शकतील.

डिजिटल आर्ट इंस्टॉलेशन्स

विमानतळाच्या परिसरात आकर्षक डिजिटल आर्ट इंस्टॉलेशन्स असतील. डिपार्चर गेट्सवर सात गोलाकार LED स्क्रीन्स प्रवाशांचे स्वागत करतील. त्याशिवाय, आत दोन मोठ्या इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले आणि सिक्युरिटी चेकनंतर एक विशाल इंस्टॉलेशन असेल, जे जगातील सर्वात मोठ्यांपैकी एक मानले जाते. येत्या काही महिन्यांत विमानतळाच्या Art Programme अंतर्गत महाराष्ट्रभरातून आणलेल्या धाग्यांपासून तयार केलेले Fabric Forest आणि सिक्युरिटी चेकनंतर तणाव कमी करणारे Immersive Digital Experience देखील सादर केले जाईल.