नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाच महिन्यांनी सुरू होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहरातील पोलिसांना विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन चार पोलीस ठाणे पुढील सहा महिन्यांच्या आत सुरू करण्याचे सूतोवाच सोमवारी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले. बेलापूर येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संबंधीचा प्रस्ताव गृह विभागाकडे अंतिम टप्यात असून नवीन चार पोलीस ठाण्यांसोबत नवीन तिसऱ्या परिमंडळ क्षेत्राची रचना सुद्धा नवीन सुरक्षेच्या आराखड्यात सुचविण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने नव्या रचनेप्रमाणे परिमंडळ क्षेत्र आणि नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या विविध २० पोलीस ठाण्यांमधून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाते. पाच महिन्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून प्रत्यक्षात वाहतूक सुरू होत असल्याने नवी मुंबईवर प्रवासी आणि निवासी लोकसंख्येचा ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुरक्षेबाबतची खबरदारी घेण्यास सुरूवात केली असून आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्याचे नियोजन पोलीस आयुक्तांनी आखले आहे. उलवा पोलीस ठाणे चार महिन्यांपूर्वी सुरू केले असून त्याचसोबत विमानतळ पोलीस ठाणे, करंजाडे, द्रोणागिरी आणि ऐरोली ही आणखी चार नवीन पोलीस ठाणी नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे. या प्रस्तावातील त्रुटी दूर करुन सूधारित प्रस्ताव सुद्धा गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर ही चार पोलीस ठाण्यांच्या इमारतीचे बांधकाम आणि यामध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळाची तरतूद केली जाणार आहे.

गृह विभागाच्या मंजुरीनंतर तात्पुरत्या स्वरुपात पोलीस चौकी उभारुन त्यामधून कामकाज सुरू केले जाईल. दरम्यानच्या काळात करंजाडे, द्रोणागिरी आणि एअरपोर्ट या पोलीस ठाण्यांसाठी सिडकोकडे स्वतंत्र भूखंडाची मागणी करण्यात येईल. सध्या परिमंडळ १ व २ यांमधून २० पोलीस ठाण्यांच्या कारभारावर लक्ष ठेवले जाते. नवीन परिमंडळ ३ सुरू झाल्यानंतर पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली परिसराचे कामावर नियंत्रण ठेवले जाईल. परिमंडळाच्या विस्तारासोबत दोन स्वतंत्र सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयांना सुद्धा गृह विभागाने मंजूरीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त बेलापूर (सीबीडी) यांच्याअंतर्गत सीबीडी, एनआरआय आणि नेरुळ या पोलीस ठाण्यांचा कारभार सुरू राहील तर सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर यांच्या अंतर्गत खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा या वसाहतींचा कारभार केला जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दिली.

सीसीटीएनएस प्रणाली राज्यात अव्वल

महाराष्ट्र पोलीसांचा दैनंदिन गुन्हे विषयक कारभार संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करण्याची जबाबदारी प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी (नोव्हेंर २०२२) मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा ‘क्राईम ॲण्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क ॲण्ड सिस्टीम’ म्हणजेच सीसीटीएनएस प्रणालीच्या कारभाराची माहिती पाहिल्यास राज्यातील ३६ व्या क्रमांकांवर नवी मुंबई शहर होते. मात्र आयुक्त भारंबे यांचा प्रत्येक पोलीस टेक्नोसेव्ही करण्याच्या संकल्पामुळे सीसीटीएनएस प्रणालीने मागील दोन वर्षे सातत्याने राज्यात पहिला क्रमांक राखण्यात यश मिळवले आहे.

११२ वर संपर्क साधल्यास त्वरित मदत

नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनूसार कोणतीही आपत्तीची घटना घडल्यास नागरिकांनी पोलीसांना ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केल्यास २०२३ मध्ये पोलिसांची मदत पोहचण्यासाठी सरासरी ८ मिनिटे २ सेकंद लागत होती. २०२४ मध्ये ११२ क्रमांकावर ९८,७६४ विविध घटनांचे फोन पोलिसांना मदतीसाठी आले. यापैकी सरासरी ५ मिनिटे ४७ पर्यंत पोहचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शून्य नशामुक्ती

पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ‘अमली पदार्थ नवी मुंबई’ या अभियानांतर्गत ११३ ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये २०६ आरोपींवर कारवाई झाली. त्यामध्ये ५६ विदेशी ड्रग्ज पेडलरचा समावेश होता. यंदाच्या वर्षात ड्रग्ज तस्करांवर कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे. ‘शून्य नशामुक्ती’ हा संकल्प पोलीस दलाने केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police will open four new stations in six months due to airport expansion sud 02