नवी मुंबई: नवी मुंबईत राहणाऱ्या आणि पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या एका शिक्षिकेने शिक्षक पेशाला शोभणार नाही असे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तिने एका अल्पवयीन मुलाला समाज माध्यमातून अर्धनग्न अवस्थेतील चित्रीकरण पाठवले . हे चित्रीकरण नेमके पीडित मुलाच्या आईच्या निदर्शनास आल्यावर तिने थेट पोलीस ठाणे गाठून संबंधित महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शहानिशा करून पोलिसांनी संबंधित शिक्षिके विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेची ओळख इंस्टाग्रम या समाज माध्यमातून नवी मुंबईत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. कालांतराने त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. २७ तारखेला रात्री नऊच्या सुमारास त्यांनी व्हिडीओ चॅटिंग केले त्यात अर्धनग्न स्वरूपात व्हिडीओ चॅटिंग त्या अल्पवयीन मुलाने सेव्ह केले होते. हे चित्रीकरण मुलाचा मोबाईल तपासात असताना नेमके त्याच्या आईच्या निदर्शनास आले. त्यावेळी आईने मुलास खडसावून विचारले असता घडला प्रकार समोर आले. आपल्या अल्पवयीन मुला सोबत दुप्पट वयाची महिला असे कृत्य करते म्हणून तिने थेट जवळचे पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांना घडल्या प्रकराची माहिती देत संबंधित महिलेच्या विरोधात तक्रार अर्ज केला. पोलिसांनी मोबाईल तपासणी करून शहानिशा झाल्यावर मुलाच्या आईने दिलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत संबंधित महिलेच्या विरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ११ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपी महिला हि पेशाने शिक्षिका आहे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवते. पीडित मुलाची आणि तिची इंस्टाग्राम वर ओळख कधी झाली तसेच असले प्रकार कधीपासून सुरु आहेत. याबाबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरु आहे. पीडित अल्पवयीन मुलगा हा तिचा विद्यार्थी नाही. मात्र आपल्या पेक्षा अर्ध्या आणि अल्पवयीन मुलासोबत असले कृत्य तेही पेशाने शिक्षिका असलेल्या महिलेने केल्याने संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी आमचा तपास सुरु असून संशयित आरोपी अद्याप अटक नाही अशी माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत तांत्रिक तपास सुरु असून यासाठी सायबर पोलिसांचीही मदत प्रसंगी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.