पनवेल: रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दिड फूट पाणी साचले. यामुळे प्रवाशांना पाय ओले करूनच स्थानक गाठण्याची वेळ आली. सिडकोच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळी पाण्याचा वेळीच निचरा होण्यासाठी येथे मोटारपंपातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन ठेवले असले तरी त्याचा काही लाभ प्रवाशांना झाला नाही. मोटारपंप हे दिखाव्यासाठीच येथे ठेवल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
खांदेश्वर आणि मानसरोवर या स्थानकांच्या पश्चिमेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सिडको महामंडळाचे महागृहनिर्माणाचे काम सुरू आहे. यापूर्वी मोकळ्या खाडी क्षेत्रात पावसाळी पाणी साचत असल्याने स्थानकाच्या तळमजल्यावर पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते. मात्र समुद्राला भरतीच्यावेळी १०० हून कमी मीलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर स्थानकाचा तळमजला पाण्याखाली जात आहे. सिडकोच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी या कायमस्वरूपी पावसाळ्यात निर्माण होणारा प्रश्न सोडविण्यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून होत आहे. परंतू विमानतळ प्रकल्पात, भूखंड विक्रीत आणि महागृहनिर्माणातील घरे बांधण्यास प्राधान्य देणा-या सिडको मंडळाच्या उच्चपदस्थांना सामान्य प्रवाशांच्या दरवर्षी भेडसावणा-या प्रश्नाकडे लक्ष्य देण्यासाठी वेळ नसल्याची बोंब येथील प्रवाशांकडून सुरू आहे.
सोमवारी या दोन्ही स्थानकांमध्ये पावसाचे साचलेल्या पाण्यामुळे अक्षरशा प्रवाशांचे हाल झाले. पाय, कपडे आणि पादत्राणे ओली करुनच स्थानकात रेल्वे गाठण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. यामध्ये रुग्ण प्रवाशांचे हाल झाले. हीच का सिडकोची स्मार्ट सीटी अशा प्रवाशांच्या तिखट प्रतिक्रिया एेकायला मिळत होत्या. सिडकोच्या तज्ज्ञ शहर नियोजनकारांनी स्मार्टसीटीमध्ये रेल्वे स्थानकात जाण्याचा मार्ग समुद्रसपाटीपेक्षा सखल भागातून काढल्याने हा त्रास प्रवाशांना होत आहे. खांदेश्वर व मानसरोवर या दोनही स्थानकाच्या भूयारी मार्गात साचणा-या पाणी उपसा करणा-यासाठी एकमेव मोटारपंपाचा वापर करण्याशिवाय इतर उपायांची तपासणी केली नाही. सिडकोच्या उच्चपदस्थांनी या आपत्तीवेळी कधीच या परिसराला साधी भेटही दिली नाही. या उच्चपदस्थ अधिका-यांना सर्वसामान्यांचा हा प्रश्न तेवढा गंभीर वाटत नसेल मात्र सामान्य प्रवासी याच गुडगाभर पाण्यातून स्वताची नोकरीची वाट शोधत आहेत. सिडकोचे आपत्ती व्यवस्थापन विभाग हे शोभेपुरते राहील्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
पनवेल: रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे हार्बर मार्गावरील खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वेस्थानकाच्या तळमजल्यावर दिड फूट पाणी साचले. यामुळे प्रवाशांना पाय ओले करूनच स्थानक गाठण्याची वेळ आली.https://t.co/2jrmCKw8Ui#viralvideo #Panvel #Railway… pic.twitter.com/6C69xuj6Sl
— LoksattaLive (@LoksattaLive) September 15, 2025
एक ते दीड फुट पाणी स्थानकाबाहेर काढण्यासाठी सिडको मंडळाच्यावतीने येथे मोटारपंप बसविल्याचे सांगीतले जाते. मात्र स्थानकात पाणी साचले आहे हे समजण्यासाठी वेगळी कोणती यंत्रणा येथे सिडको मंडळाने उभारलेली नाही. जागरुक प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर नेहमी प्रमाणे सिडको मंडळाचे अधिकारी स्थानकात नेमलेल्या कर्मचा-यांना मोटारपंप सूरु करण्याचे आदेश देतात. त्यानंतर ही मोटारपंपाव्दारे पाणी उपसाची यंत्रणा सुरू होते.
सोमवारी प्रवाशांना याच तकलादू आणि सूस्त यंत्रणेचा फटका सहन करावा लागला. विशेष म्हणजे सिडको मंडळाने खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वे स्थानकांलगतच्या वाहनतळाचे आरक्षण हटवून त्या एेवजी प्रधानमंत्री आवास योजनेतील शेकडो घरांचा महागृहनिर्माण प्रकल्य हाती घेतला आहे. स्मार्टसीटीची उभारणी करणा-या सिडको मंडळाने अजूनही पुढील ५० वर्षांचा पाऊस बरसण्याची सरासरी विचार करुन या महागृहनिर्माणांचे नियोजन वेळीच न केल्यास रेल्वेस्थानकासोबत सिडकोच्या वसाहतींमध्ये काही वर्षांनी पुरस्थितीला सामोरे जावे लागेल.