पनवेल : भारतीय रेल्वे महामंडळाचा ढीम्म कारभाराचा फटका ऐन गणेशोत्सवात कोकणातील गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता पनवेल रेल्वेस्थानकात येणारी सावंतवाडी स्पेशल एक्सप्रेस शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल आठ तास स्थानकात ताटकळत बसावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे मंडळाच्या सूचना देणाऱ्या उदघोषणा विभागातील कर्मचारीसुद्धा नेमकी किती वाजेपर्यंत एक्सप्रेस येईल याची निश्चित माहिती देऊ न शकल्याने रेल्वे मंडळाचा पुन्हा एकदा बेभरवशाच्या कारभाराचा सामना प्रवाशांना करावा लागला.

हेही वाचा – माहिती अधिकार फलकासाठी भीक मांगो आंदोलन

गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी हजारो चाकरमानी मुंबईतून कोकणात दाखल होतात. तिकीट भाडे स्वस्त आणि सामानासह प्रवास करता येतो त्यामुळे चार महिन्यांपूर्वी रेल्वे प्रवासाचे तिकीट आरक्षित केले जाते. मात्र प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात होते त्यावेळेस रेल्वेच्या अनिश्चित कारभाराचा अनुभव मिळतो. पनवेल रेल्वेस्थानकात शुक्रवारी मध्यरात्री मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सावंतवाडीला जाणारी स्पेशल एक्सप्रेस रेल्वे सकाळी सव्वाआठ वाजता आली. यामुळे प्रवाशांना सात तास स्थानकात ताटकळत बसावे लागले. नेमका खोळंबा कशामुळे झाला याचे उत्तर प्रवाशांना स्थानकात न दिल्याने प्रवासी संतापले होते. शुक्रवारी दुपारी ही एक्सप्रेस कोकणात कणकवली स्थानकात पोहोचणार होती. मात्र सकाळी सव्वा आठ वाजता या रेल्वेचा प्रवास पनवेलमधून सुरू झाल्याने चाकरमानी कोकणात पोहोचण्यासाठी अजून आठ तासांचा विलंब लागणार आहे.

हेही वाचा – ऐन गणेशोत्सवाच्या तयारीत गव्हाण ते खारपाडा मार्गावर कोंडी; चार ते पाच तासांपासून नागरिक कोंडीत अडकले

ऐन गणेशोत्सव काळात रेल्वेला रात्रीचा शटडाऊन घेण्याचे नियोजन दिल्लीत बसलेले अधिकारी करत असतील तर ते धन्य आहेत. राज्यातील नेत्यांना सामान्यांवर या निर्णयामुळे काय आपबीती झाली याची कल्पना नाही. कोकणी माणसांकडून मतांची अपेक्षा ठेवायची आणि वर्षातून एकदा येणाऱ्या उत्सवासाठी सोय होत नसेल तर धर्माचे सरकार निवडून दिल्याचा काही लाभ झाला नाही. गावी जाण्यासाठी चार महिन्यांपूर्वी तिकीट बुकींग करूनही ऐनवेळी आठ – आठ तास पनवेल स्थानकात ताटकळत रहावे लागले. नेमकी कधी एक्सप्रेस येणार याची माहिती घोषणा देणाऱ्यांकडे नाही. वेटिंग रूममध्ये बालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्याची क्षमता आहे का याची तरी सोय केली पाहिजे. विज्ञानाच्या आधुनिक युगात आपण चंद्रावर पोहोचलोय मात्र रेल्वे कुठे थांबली कधी येईल याची माहिती मिळत नसेल तर हा असा कारभार करणाऱ्यांना गणराया बुद्धी देवो. गणेशोत्सवासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये रात्रीचे शटडाऊन बंद करण्याची बुद्धी या अधिकाऱ्यांना देवाने देवो. – कृष्णा सावंत, सिंधुदुर्ग शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ, कळंबोली

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawantwadi special express arriving at panvel railway station arrived late people going to konkan face problem ssb