नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकाला फटका बसला असतानाच आता थंडीमुळेही टोमॅटो पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई एपीएमसीत टोमॅटोची आवक घटली असून, दरांत ३०-३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी किरकोळ बाजारातही टोमॅटोचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात मोठा चढ-उतार होत आहे. ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोची आवक वाढल्याने दर काही प्रमाणात स्थिर राहिले होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुंबई एपीएमसीच्या घाऊक भाजीपाला बाजारात १६ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता मात्र २० ते २८ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. सोमवारी बाजारात २२३८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. जी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आवक घटल्याने केवळ आठवड्याभरातच टोमॅटोच्या दरात तब्बल ३० ते ३५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिक, पुणे आणि नगर भागातून येणाऱ्या मालाची आवक गेल्या काही दिवसांत घटली आहे. हवामानातील बदल, थंडीची चाहूल आणि उत्पादनातील असमतोल यामुळे घाऊक बाजारात टोमॅटोचा माल कमी पोहोचल्याने दर वाढले आहेत. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडी जाणवू लागल्याने वातावरणात धुके निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, लागवडीतील टोमॅटो पिकाचे फुल आणि कळी गळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आधी पाऊस आणि आता थंडी यामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, बाजारातही टोमॅटोच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

सध्या बाजारात दरवाढीमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाल्याचे एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून कमी भावाने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. सध्याची वाढ त्यांच्यासाठी काही काळापुरता दिलासा देणारी ठरली आहे. मात्र, किरकोळ बाजारात या भाववाढीचा फटका थेट ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे.