Navi Mumbai News : नवी मुंबई येथील महापे भागात कर्तव्यावर असलेले वाहतुक शाखेतील पोलीस हवालदार गणेश पाटील यांचा महापे उड्डाणपुलाखाली वाहतूक नियमन करत असताना क्रेनखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील अवजड वाहनांच्या सुरू असलेल्या बेदरकारकार वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून मनसेने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेऊन अवजड वाहतुक संदर्भात महत्त्वाची मागणी केली आहे.

अवजड वाहने, क्रेन यांच्या वाहतुकीमुळे नवी मुंबईकरांची डोकेदुखी वाढली आहे. वाहतुक कोंडी, बेदरकारपणे वाहने चालिवणे यामुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या अवजड वाहतुकीतून नागरिकांना दिलासा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापे भागात वाहतुक पोलीस हवालदार गणेश पाटील हे २४ जुलैला वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी एका क्रेनखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे आणि मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नेरुळ पूर्व येथील कार्यालयात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गवांदे यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्याकडे मागणी केली.

नवी मुंबईतून प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने वाहतूक विभागाच्या नियमांचे पालन करत नाही. ट्रक, ट्रेलर, डंपर, क्रेन, कंटेनर सारखी अवजड वाहने सर्रासपणे अतिरिक्त सामान घेऊन वाहतूक करतात. मार्गिकांचे नियम (लेन) आणि वेगमर्यादा यांचे वारंवार उल्लंघन होत असते. एवढी मोठी अवजड वाहने चालक एकटाच चालवत असतो. त्याच्या बरोबर एक मदतनीस असणे आवश्यक आहे. अवजड वाहनांच्या चालकांचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नसते, चारित्र्य पडताळणी झालेली नसते. हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे.

शालेय बस ची सुद्धा अशीच दुर्दशा आहे. या बाबतीत वाहतूक विभागाने भरारी पथके नेमून अवजड वाहने, शालेय बस यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना गजानन काळे यांनी उप प्रादेशिक अधिकारी गजानन गवांदे यांना केली. तसेच नियम न पाळणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकर वरील सर्व बाबींवर कारवाई करू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले.