डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ एका अनोळखी महिलेचा खून झाल्याच्या घटनेने तलासरी परिसरात खळबळ उडाली होती. पालघर पोलिसांनी या गुन्ह्याची तत्परतेने दखल घेत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवे रोडच्या पुलाजवळ अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. गळ्याला ओढणीने आवळून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीने तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तयार केली. या पथकांनी कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, मयत महिलेचे फोटो विविध प्रसारमाध्यमांत प्रकाशित केले. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्यांनी सर्वप्रथम महिलेची ओळख पटवली. ती अफसाना खान (वय २५, रा. सुरत) असल्याची खात्री झाली.
मयत महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिच्याबद्दल अधिक तपास केला. या तपासामध्ये, पोलिसांनी तिचा पती साकीरअली मन्सुरी (वय ४३, चालक, रा. सुरत) याला गुजरात-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आच्छाड बॉर्डर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अनैतिक शारीरिक संबंधाच्या कारणावरून हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी साकीरअली मन्सुरी याला अटक केली असून, तलासरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
