सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांना त्याचा फटका बसणार आहे. याशिवाय मीठ व वीट उत्पादन सुरू होण्यास महिन्याभराचा विलंब लागणार आहे. तसेच रस्ते दुरुस्तीसह नवीन रस्त्यांची उभारणी संदर्भातील कामांची रखडपट्टी सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मात्र पूर्व व पश्चिम भागांतील समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उद्भवलेल्या वादळी परिस्थितीमुळे राज्यासह पालघर जिल्ह्यात पाऊस सुरूच राहिला. नवरात्री व त्यानंतर चक्क दिवाळीदरम्यान पावसाने जिल्ह्यातील विविध भागांना झोडपून काढल्याने कृषीविषयक कामांचे तसेच व्यवसायांचे चक्र किमान एक महिन्याच्या विलंबाने सुरू होणार आहे. याचा फटका सर्व संबंधित व्यवसायांना बसणार असून नोव्हेंबरनंतर पावसाने कृपादृष्टी दाखवावी, अशी प्रार्थना शेतकरी व इतर व्यावसायिकांकडून केली जात आहे.

यंदाच्या हंगामात जुलै महिन्यातील काही दिवस वगळता सातत्याने पाऊस झाल्याने भाताला चांगले पीक आले होते. भातपीक कापणीच्या अवस्थेत असताना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे मोठ्या आशेने आपल्या शेताकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. पाऊस नोव्हेंबर महिन्याच्या आरंभी देखील सातत्याने सुरू राहिल्याने कापणीची प्रक्रिया अजूनही लांबणीवर पडली आहे.

कापणी रखडल्यामुळे तसेच सणांमुळे कापणीसाठी मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली. यामुळे भाताची मळणी, झोडणी व तांदूळ उत्पादन करून साठवणूक करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे यंदा ऑक्टोबर उष्णतेचा खूप कमी प्रभाव जाणवला. शेतजमीन ओली राहिल्याने व उष्णता नसल्याने रब्बी पिकाची पेरणी किमान महिनाभर विलंबाने होणार आहे. शिवाय तोपर्यंत थंडीचा हंगाम सुरू होण्याची शक्यता असून रब्बी पिकांच्या बियाण्याच्या उगवणीवर (जर्मिनेशन) परिणाम होण्याची शक्यता आहे.

भाताच्या कृत्रिम उगवणीसाठी असणाऱ्या भाताच्या बियांवरील प्रक्रिया करण्याची पद्धत रब्बी पिकांसाठी विशेष परिणामकारक नसल्याने यंदाच्या हंगामात रब्बी लागवड क्षेत्रावर व उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा, वाल, कडधान्य, तृणधान्य, तीळ इत्यादी रब्बी पिकं घेतली जात असून त्याचबरोबर भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. या लागवडीवर लांबलेल्या पावसामुळे परिणाम होणार असून रब्बी लागवड क्षेत्र कमी होण्याची तसेच काही ठिकाणी रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लांबलेल्या पावसामुळे यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आंब्याला मोहर येण्यासाठी पोषक वातावरण असले तरी अरबी समुद्रात अधूनमधून निर्माण होणाऱ्या वादळी परिस्थितीमुळे अवकाळी पावसाची भीती कायम आहे. वाऱ्यासह पाऊस झाल्यास आंबा, चिकू व इतर फळझाडांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विटांचे उत्पादनावर २० टक्के परिणाम

दिवाळी सरली की वीटभट्टीच्या कामांना सुरुवात होते. विटा पाडण्यासाठी सुक्या मातीची आवश्यकता असते, मात्र यंदा लांबलेल्या पावसामुळे अशी माती मिळणे कठीण झाले आहे. सुक्या मातीमध्ये फ्लाय एश, तूस, बॉयलरची राख, काळी राख, रॅबिट तुकडा इत्यादी मिश्रण सुकवून त्यापासून विटा पाडल्या जातात. सुमारे सहा ते नऊ दिवसांनी या विटांची रचना भट्टीमध्ये करून विटा तयार करण्यासाठी वीटभट्टीला पेटविण्यात येते. यंदा लांबलेल्या पावसामुळे हा व्यवसाय किमान एक महिना लांबणीवर पडला आहे. एप्रिलच्या अखेरीस विटांचे उत्पादन बंद केले जात असल्याने यंदा विटांच्या उत्पादनावर किमान २० टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिठाच्या उत्पादनावर परिणाम

गांधी जयंतीपासून सर्वसाधारणपणे मीठ उत्पादक हे मिठागराच्या पूर्वतयारीला आरंभ करतात. मीठ उत्पादनासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागत असून मिठागरामध्ये समुद्राचे निमखारे पाणी घेतल्यानंतर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीमध्ये मीठ उत्पादनाला आरंभ होतो. मात्र नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने मिठागराच्या पूर्वतयारीला अधिककाळ लागण्याची शक्यता आहे. पावसाने डिसेंबर महिन्यापासून पूर्णपणे उघडीप दिल्यास सरासरीच्या ७५ टक्के उत्पादन घेता येईल अशी आशा मीठ उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर तालुक्यातील व विशेषत: केळवे येथील सहकारी मिठागराला ५० टक्के नुकसानीला सामोरे जावे लागले होते. लांबलेल्या पावसामुळे मिठाच्या उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

रस्ते दुरुस्ती लांबली

पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना आरंभ होऊन नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतात. जिल्ह्यात काही ठिकाणी दसऱ्यानंतर तर बहुतांश ठिकाणी दिवाळीनंतर डांबर प्रकल्प सुरू करण्याची प्रथा आहे. सद्य:स्थितीत अशा डांबर प्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाले असले तरीही लांबलेल्या पावसामुळे प्रकल्प सुरू होण्यास २० ते २५ दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. शिवाय रस्ते ओले असल्याने त्यावर डांबरीकरण केल्यास डांबराचा थर लगेच फाटत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत संबंधित ठेकेदाराचा दोषदायित्व कालावधी असल्याने त्यांना खराब झालेल्या कामांची दुरुस्ती अथवा अशी कामे पुन्हा करावी लागतात. यामुळे रस्त्यांच्या दुरुस्ती, डागडुजी व नव्याने रस्ता उभारणीच्या कामाला देखील उशीर होणार आहे.