पालघर : करोना काळामध्ये उपनगरीय सेवेची फेररचना केल्यानंतर बंद करण्यात आलेली सकाळी ७.०५ वाजताची डहाणू- विरार सेवा पूर्ववत करण्याबाबत रेल्वे व्यवस्थापन विचाराधीन असल्याचे माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्जाच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळामध्ये अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या सत्रात कामावर जाण्यासाठी पहाटे लवकर डहाणू रोड येथून सुटणारी उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली होती. या विशेष सेवेसाठी डहाणू रोड- विरार दरम्यान धावणारी सकाळी ७.०५ वाजताच्या गाडीचा रेक वर्ग करण्यात आला होता. मात्र रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतर ७.०५ गाडी सेवा पूर्ववत करण्यासाठी लोको रेक (डबे) उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात याच गाडीच्या वेळेमध्ये एक अन्य जलद गाडीला स्थान देण्यात आल्यामुळे नव्याने गाडी चालविणे रेल्वे प्रशासनाला शक्य नसल्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली होती.

हेही वाचा : वसई भाईंदर रो रो सेवेला गाळाचा अडथळा, पुढील आठवड्यात प्रायोगिक सेवा होणार सुरू

ही सेवा रद्द केल्यामुळे पाठोपाठ पाच मिनिटानंतर धावणाऱ्या उपनगरीय सेवेवर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात त्राण निर्माण झाला होता. वसई, विरार येथील प्रवाशांची या गाडीमध्ये गर्दी वाढल्याने बोईसर, पालघर येथे गाडी भरत असे. त्यामुळे पुढील रेल्वे स्थानकातील प्रवाशांना गाडीत चढणे कठीण होत असे. या पार्श्वभूमीवर सकाळी ७.०५ वाजता डहाणू रोड येथून विरार पर्यंत असलेली लोकल सेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी येथील प्रवासी संघटना व लोकप्रतिनिधींनी वारंवार लावून धरली होती.

या संदर्भात प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी विजय शेट्टी यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही सेवा पूर्ववत करण्यासंदर्भात पश्चिम रेल्वे गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन प्रवाशाच्या दृष्टिकोनातून ही गाडी महत्त्वाची असल्याने निवडणूक आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी ही सेवा पूर्ववत करण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. या संदर्भातील प्रस्ताव पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून त्याच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.

हेही वाचा : पालघर : समर्पित मालवाहू मार्गीकेची चाचणी पूर्ण

स्वतंत्र लोको रेक व मोटरमन-गार्डची व्यवस्था

डहाणू रोड- विरार दरम्यान विशेष फेरी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विरार लोको शेड येथून पहाटे एक रिकामी गाडी डहाणू रोड पर्यंत आणण्याचे प्रास्तावित आहे. सात वाजताच्या सुमारास ही उपनगरीय सेवा डहाणू रोड येतुन सुटून ८३० वाजता ही लोकल विरार येथे पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर या गाडीची रवानगी पुन्हा विरारच्या लोको यार्ड मध्ये होण्याची आखणी करण्यात येत आहे. यासाठी एक मोटरमॅन व गार्डची अतिरिक्त गरज भासणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसत्ताला दिली.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar railway administration to resume dahanu virar local train service in morning 7 05 am css
First published on: 16-02-2024 at 10:03 IST