पालघर : आदिवासी भागातील आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील १० आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. तपासलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने ठोस परिणामांकडे वाटचाल करताना तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपायोजना करायचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवण व न्याहारी मध्ये पोषणमूल्य पुरेशा प्रमाणात देण्यासाठी सर जे.जी समूह रुग्णालयामधील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

सर जे.जी समूह रुग्णालय अंतर्गत पालघर येथे असणाऱ्या आरोग्य पथक (ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण संस्था) येथे एमबीबीएस उत्तीर्ण झालेले ५० प्रशिक्षणार्थी, पादुत्तर् वैद्यकीय शिक्षण घेणारे दोन निवासी डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यां मार्फत दंतचिकित्सा, प्रसुती पूर्व तपासणी, लसीकरण व इतर आरोग्य सेवा पुरविल्या जातात. या आरोग्य पथक केंद्रामध्ये लवकरच शस्त्रक्रिया कक्ष कार्यरत होणार असून त्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांच्या मदतीने विविध शस्त्रक्रिया सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याशी या आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता आश्रम शाळेत निवास करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य सर्वेक्षण करून त्याचा चाचणी अभ्यास (केस स्टडी) करण्याचे योजिले गेले. प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जी समूह रुग्णालयामार्फत जून व जुलै महिन्यात पालघर तालुक्यातील दहा आश्रम शाळांमधील ३९५७ विद्यार्थ्यांची तपासणी जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गीता परदेशी, आरोग्य प्रथक संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राकेश वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन नवले, डॉ. बालाजी नलगोंडे व सहकारी कर्मचाऱ्यांनी केले.

नंडोरे, मेंढवन, खुटल, एम्बुर, ताकवहल, नानिवली, लालठाणे, गोवाडे, आंबेसरी व ढेकाळे येथील आश्रम शाळेत संपन्न झालेल्या आरोग्य तपासणी मध्ये ३०.९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आढळले असून १०.७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये ठेंगणेपण, २६.५० टक्के विद्यार्थ्यांमध्ये कमी उंची असल्याचे प्रमाण दिसून आले. त्याचप्रमाणे १५.५० टक्के विद्यार्थ्यांमध्ये कृशता (थीननेस) व १८.८० टक्के विद्यार्थी दोन्ही प्रकारच्या कुपोषणाने प्रभावित असल्याचे आढळून आले. पालघर तालुक्यातील पूर्वपट्टीतील काही शाळांमध्ये कुपोषित विद्यार्थ्यांची प्रमाण लक्षणीय असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यासंदर्भात योजना तयार करण्यात येत आहे.

या आरोग्य चाचणी अभ्यासाच्या निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर आश्रम शाळांमधील आहार अधिक पोषक व सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून मुलांसाठी प्रथिन युक्त अल्पोपहार तर मुलींसाठी ॲनिमिया प्रतिबंधक योजना, मासिक पाळी स्वच्छता मोहीम, सूक्ष्म पोषक गोळ्या देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या अभ्यासादरम्यान काही आश्रम शाळेतील शौचालयाची दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आल्याने स्वच्छ पाण्याची उपलब्धता, शौचालय, हात धुण्यासाठी सुविधा याकडे देखील लक्ष देण्यात येणार असून नियमित कृमीनाशक औषध विद्यार्थ्यांना नियमितपणे दिली जाणार आहेत. याच बरोबरीने आश्रम शाळेतील शिक्षक वॉर्डन व स्वयंपाकी यांना पोषण व स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्याची जिल्हा प्रशासनाने योजिले आहे.

ज्या विद्यार्थ्यां ची प्रकृती व वाढ समाधानकारक नाही अशा विद्यार्थ्यांना तातडीने औषधउपचार व लक्ष देऊन त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी करण्याची देखील योजना आखण्यात आली आहे. या निष्कर्षामुळे पोषण अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व आयुष्यमान भारत शालेय आरोग्य कार्यक्रम यांना नवीन बळ मिळाले असून याच बरोबरीने शून्य उपासमार, उत्तम आरोग्य व गुणवत्तापूर्ण शिक्षण या जागतिक उद्दिष्टांच्या पूर्ततेकडे पालघर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

आश्रम शाळांसाठी कृती आराखड्याची आखणी

पालघर तालुक्यात झालेली अभ्यासत्मक आरोग्य चाचणी ही राज्यात सर्वात मोठ्या शालेय पोषण मूल्यांकनांपैकी ठरली आहे. यामुळे शासनाला भविष्यातील धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यासाठी दिशा मिळाली असून शिक्षण आरोग्य व पोषण या तिन्ही घटकांचा संगम आगामी काळात साधणारे आश्रम शाळा हे बदलाचे केंद्र ठरणार आहे.

पालघर तालुक्यातील १० आश्रम शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी दरम्यान त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण व इतर आरोग्य विषयक समस्या असल्याचे आढळून आले आहे. मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या न्याहारी व जेवणाच्या पोषण मूल्यांमध्ये तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार बदल करण्यासाठी उपाय योजना आखल्या जातील. – डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी