पालघर : वाढवण बंदराच्या उभारणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने कौशल्य विकासा संदर्भात अनेक उपक्रम राबवले असून डहाणू तालुक्यात डाय मेकिंग उद्योगाला पूरक ठरावे म्हणून डाय मेकिंग भवन उभारण्याचा निश्चय राज्य सरकारने केल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मनोर येथे केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती पंतप्रधान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा व विकास कामांचा शुभारंभ निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिपादन केले.

कौशल्य विकासाचा माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट झाल्यानंतर पालघरकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले असून जिल्ह्यातील ७३५ जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे योजिण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर समुद्री नौकानयन विषयक अभ्यासक्रम जेएनपीए व शिपिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरू केला जाणार असून कृषी उत्पादने व प्रक्रिया याबाबत देखील अभ्यासक्रम सुरू करण्याचा आपला विभाग विचाराधीन असल्याची त्यांनी सांगितले.

वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्हा प्लास्टिक मुक्त व दुर्गंधी मुक्त करण्यासाठी अभियान हाती घेतल्याची माहिती दिली. यंदाच्या वर्षी १८ कोटी झाड लावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिली. आगामी काळात राज्यात २५० कोटी झाडे लागवड करण्याचे नियोजन केले जात असल्याची त्यांनी माहिती दिली. पालघर जिल्ह्यात पुढील साडेचार वर्षात तीन लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता पाहता बदलणाऱ्या परिस्थितीत स्थानिकांना सोबत घेऊन विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा व राज्य प्रशासनाकडून जनता अभिमुख कारभार करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम मिळाल्याबद्दल तसेच शिक्षक भरती झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भूमिपुत्रांना नोकरी संधी मिळावी असेही त्यांनी सांगितले. पालघरचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गावागावांमध्ये रोजगार मिळण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगत स्थलांतर रोखण्यासाठी तसेच तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होत असून पालघर जिल्हावासियांसाठी नवीन पर्व सुरू होत असल्याचे ते म्हणाले.