पालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केलेल्या जून/जुलै २०२५ च्या दहावी (माध्यमिक) आणि बारावी (उच्च माध्यमिक) फेरपरीक्षेचा निकाल पालघर जिल्ह्यासाठी संमिश्र राहिला. यामध्ये दहावीचा निकाल २१.०३ टक्के व बारावीचा निकाल ३४.३९ टक्के लागला आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२४-२५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून जुलै महिन्यात पार पडली. दहावीच्या फेरपरीक्षेत पालघर जिल्ह्यातून एकूण १०७८ विद्यार्थी बसले होते. यात ७३२ मुले आणि ३४६ मुलींचा समावेश होता. यापैकी २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्यात १४० मुले आणि ७८ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल २१.०३ टक्के लागला आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २०.०२ टक्के तर मुलींचे प्रमाण २४.०७ टक्के आहे.

बारावीच्या फेरपरीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून एकूण २४६३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, ज्यात १५६२ मुले आणि ९०१ मुली होत्या. यापैकी ८२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्यात ५०४ मुले आणि ३२४ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ३४.३९ टक्के लागला आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ३३.०४ टक्के तर मुलींचे प्रमाण ३६.७३ टक्के आहे.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मुख्याध्यापकांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी पालघर जिल्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.