पालघर : भगवान बिरसा कला संगम आणि आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक स्पर्धेत पालघरच्या आदिवासी यूट्यूब कलाकारांच्या समूहाने आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या कलाकारांनी आपली साधी, पारंपरिक वेशभूषा आणि उत्तम तारपा नृत्याचे सादरीकरण करत प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकली.

धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूर येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आदिवासी पारंपरिक नृत्य, वाद्य, गायन, रील्स, ब्लॉग, चित्रकला, छायाचित्रण आणि डॉक्युमेंटरी अशा नऊ विविध स्पर्धांचा समावेश होता. महाराष्ट्रातील पाच विभागांत (कोकण, नाशिक, धुळे, गडचिरोली आणि विदर्भ) प्रथम ऑनलाइन आणि त्यानंतर विभागीय फेऱ्या पार पडल्या. या विभागीय स्पर्धेतून निवड झालेल्या सुमारे २४ हजार स्पर्धकांमधून केवळ ९०० स्पर्धकांना राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी संधी मिळाली.

या चुरशीच्या स्पर्धेत कोकण विभागातून रवि सातपुते आणि त्यांच्या १५ कलाकारांच्या समूहाने आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेसाठी निवड मिळवली. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या २० नृत्य पथकांमध्ये पालघरच्या या चमूने आपल्या आदिवासी पारंपरिक सरळ साध्या वेशभूषेत, अस्सल तारपा नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करत परीक्षकांकडून सर्वाधिक गुण मिळवले आणि प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी केवळ पालघर जिल्ह्याचेच नव्हे, तर आपल्या समृद्ध संस्कृतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले.

रवि सातपुते आणि त्यांच्या ग्रुपला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे चंद्रकांत बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालघरचे हे तरुण आदिवासी कलाकार केवळ मनोरंजनासाठी गाणी आणि व्हिडिओ बनवत नाहीत, तर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्कृतीचा प्रभावी प्रसार आणि प्रचार करत आहेत. यामुळे पालघरच्या आदिवासी संस्कृतीला डिजिटल व्यासपीठावर एक नवी ओळख मिळत आहे. या यशाबद्दल बोलताना रवि सातपुते यांनी सांगितले की, “आपल्या पालघर जिल्ह्याची ओळख असलेले तारपा नृत्य जगभर प्रसिद्ध करण्यासाठी तरुण पिढीने पुढे आले पाहिजे आणि आपल्या आदिवासी संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे.” या कलाकारांनी आपल्या प्रतिभेने जिल्ह्यात एक नवी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

कलाकारांना अश्रू अनावर

नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यभरातून २० संघ सहभागी झाले होते. यातून पालघर जिल्ह्याला प्रथम क्रमांक जाहीर झाल्यानंतर नृत्य कलाकार लक्ष्मी सातवी हिला अश्रू अनावर झाले. अत्यंत मेहनतीने आणि गरीब परिस्थितीत जगणाऱ्या या कलाकारांना मुख्यमंत्री आणि राज्याच्या दिग्गज नेत्यांचे हस्ते सत्कार झाल्यामुळे कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आदिवासी पारंपरिक राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या काही दिवस आधी पालघरमधील काही यूट्यूब कलाकार नागपूर येथे आयोजित ट्रायबल फॅशन शो मध्ये गेले होते. पालघरच्या या कलाकारांनी केवळ सांस्कृतिक स्पर्धांमध्येच नाही, तर इतर मंचांवरही आपली उपस्थिती नोंदवत जिल्ह्याची कलात्मक ओळख नागपूरमध्ये अधिक ठळक केली. यामुळे त्यांची कला आणि सांस्कृतिक बांधिलकी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती एका व्यापक सामाजिक व सांस्कृतिक ध्येयाशी जोडलेली असल्याचे स्पष्ट होते.