-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे लोकसभा अतिशय महत्त्वाची मानली जाते. गेल्याकाही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात भाजपाचे बळ वाढत असल्याने आता ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवर भाजपाने दावा करण्यास सुरूवात केली आहे.
-
महायुतीच्या माध्यमातून शहरात शिंदे याची शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) बैठका घेतल्या जात आहे. परंतु उमेदवार निश्चित होत नसल्याने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
-
शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची नावे पुढे येत आहेत.
-
गेल्याकाही दिवसांपासून ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी ठाणेच्या जागेवर भाष्य केले आहे.
-
दरेकर यांच्या या विधानाने ठाणे लोकसभेसाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
“ठाणे लोकसभा भाजपासाठी वेगळे ठिकाण आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेसाठी भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा टोकाचा आग्रह करत आहेत. ठाण्यात कधीकाळी भाजपाचे रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे हे खासदार होते. सध्या ठाण्यात आमचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमची मागणी आहे, तो कार्यकर्त्यांचा अधिकार आहे.” असे दरेकर म्हणाले आहेत.
-
ठाण्यातील वर्तकनगर भागात भाजपाने प्रशस्त कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय पाहण्यासाठी दरेकर ठाण्यात आले होते. “राज्यात तीन ते चार ठिकाणी उमेदवारी निश्चित होणे शिल्लक आहे. तीन पक्ष एकत्र येऊन काम करतात. त्यावेळी उमेदवारी बाबत प्रश्न निर्माण होत असतात.” असे ते म्हणाले.
-
“सध्या ठाण्यात आमचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे असे दरेकर म्हणाले. आम्हाला लोकसभेची जागा मिळेपर्यंत कार्यकर्ते आग्रह धरतील. परंतु महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही किंवा शिंदेचे पदाधिकारी उमेदवारासाठी काम करतील. जर ही जागा भाजपाला मिळाली. तर शिंदे यांचे कार्यकर्ते ताकदीने काम करतील.” असेही ते म्हणाले.
-
सर्व फोटो साभार- Pravin Darekar – प्रविण दरेकर/Facebook Page
Loksabha Election 2024: प्रवीण दरेकरांचं ठाणे लोकसभा जागेबद्दल सूचक वक्तव्य; म्हणाले “लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमची..”
ठाण्यातील वर्तकनगर भागात भाजपाने प्रशस्त कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय पाहण्यासाठी दरेकर ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.
Web Title: Pravin darekar on thane loksabha constituency latest news of thane politics mahayuti eknath shinde thane spl