-
“पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय बनले असून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणांचा वापर करून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून वसुली केली जाते.”
-
“करोना काळात बंदी असलेल्या औषध विक्रीला परवानगी देण्यासाठी १८ कोटींची वसुली निवडणूक रोख्यातून केली.”
-
“अशा मौत का सौदागरच्या हाती पुन्हा देश देण्याची चूक करू नका.” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल ५ मे रोजी मिरजेत केले.
-
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते.
-
यावेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी स्थायी सभापती निरंजन आवटी यांची भाषणे झाली.
-
यावेळी अॅड. आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “करोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या रेमडिसिवयरचे उत्पादन गुजरातमधील कंपनीकडून केले जात होते.”
-
“१८ कोटी रुपये निवडणूक रोख्यातून मिळाल्यानंतर या औषधाच्या विक्रीला देशात परवानगी देण्यात आली. या औषधाचे दुष्परिणाम म्हणून अनेकांना व्याधी जडल्या. अशा मौत का सौदागरला आपण पुन्हा संधी द्यायची का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.”
-
“पंतप्रधान कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असायला हवे. मात्र, या ठिकाणाहून निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ईडी, सीबीआय, पोलीस या यंत्रणाचा वापर करून खंडण्या गोळा करण्यात येतात.”
-
“गेल्या दहा वर्षाच्या काळात देशातील ५० कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला. दहा वर्षांपूर्वी शंभर रुपयापैकी २६ रुपये कर्ज होते, आता ते ८४ रुपयावर पोहोचले असून आणखी पाच वर्षांनी ९६ रुपयापर्यंत पोहोचेल. अशा स्थितीत देश कसा चालविणार याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय आहे” प्रकाश आंबेडकर यांचे मोदींवर टीकास्र; भाजपावर हल्लाबोल
सर्व फोटो वंचित बहुजन आघाडी या फेसबुक पेजवरून साभार.
Web Title: Prakash ambedkar on pm narendra modi and bjp goverment latest statement on bjp maharashtra sabha spl